ध्येयवेडया शिक्षकाची 'आंतरराष्ट्रीय' झेप; ‘दप्तऱ्या’, ‘विराट१८’, ‘गुड्डू’ची अमेरिकेसाठी निवड

Selection of teacher short films from Dedgaon for America
Selection of teacher short films from Dedgaon for America

नेवासे (अहमदनगर: प्रत्येकाच्या मनात समाजासाठी काहीतरी विशेष करून दाखवण्याचे स्वप्न असते. ते साकार करण्यासाठी तो धडपडतो. योग्य संधी मिळताच आपल्या स्वप्नांना गवसणीही तो घालतो. अशीच ध्येयवेडी गोष्ट आहे, शिक्षक व विद्यार्थ्यांना बरोबर घेवून झीरो बजेट लघुपट निर्मितीत आंतरराष्ट्रीय झेप घेणारे प्राथमिक शिक्षक भाऊसाहेब चंदन यांची.

देडगाव (ता. नेवासे) येथील ४५ विद्यार्थीसंख्या असलेल्या शाळेत त्यांनी आनंददायी व कृतीवर भर दिला. शालेय उपक्रमांसोबतच सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये नाटके आयोजिन करून विद्यार्थ्यांच्या अभिनय क्षमतेला वाव दिला. त्यांनी अनेक छोट्या-छोट्या कथा लिहिल्या. पण त्यात त्यांचे समाधान होत नव्हते. त्यांचे स्वप्न होते आपल्या कथेवर आधारित लघु चित्रपट बनवण्याचे..! पण त्यासाठी भांडवल नव्हते. हे स्वप्न त्यांनी आपल्या शिक्षक मित्रांसमोर मांडले. त्यानंतर अनेक मित्रांनी मदत केली.

भेंडे येथील फोटोग्राफर कदम बंधू आणि गणेश क्षिरसागर चित्रीकरणासाठी तयार झाले. पण दिग्गज कलाकार घेऊन फिल्म बनवणे आपल्या आवाक्या बाहेरचे असल्यामुळे त्यांनी परिसरातीलच इच्छुक व्यक्ती, शिक्षक व विद्यार्थ्यांना घेऊन लघुपट बनवण्याचे ठरवले. मित्रांसह विद्यार्थ्यांना घेवून त्यांनी 'दप्तर्या' हा पहिला लघु चित्रपट तयार केला. शिक्षणाची आवड असणाऱ्या गरीब मुलाच्या कुटुंबाशी निगडित याचे कथानक आहे. त्याला पुणे येथील दुसऱ्या आंतरराष्ट्रीय लघुचित्रपट महोत्सवात त्याची निवड झाली. काही कारणामुळे मोबाईलवरच शूटिंग करून शॉर्ट फिल्म तयार करण्याचे त्यांनी ठरवले.

'जलसाक्षरता' हा पाण्याचे महत्व अधोरेखित करणारा लघु चित्रपट तयार करून मोबाईलवरच एडिट केला. पुढे 'अॅडिक्ट' हा मोबाईलच्या अतिवापरामुळे होणारे दुष्परिणाम अधोरेखित करणारा लघुचित्रपट तयार केला. राष्ट्रीय फिल्म संग्रहालय पुणे येथील भव्य चित्रपट गृहात मोठ्या पडद्यावर तो दाखविण्यात आला. सर्व चित्रपट झिरो बजेट मध्येच करण्यासाठी त्यांनी स्वतः कॅमेरा विकत घेतला.

'विराट १८' आणि ' गुड्डू' असे दोन झिरो बजेट लघुचित्रपट त्यांनी बनवले. या दोन्ही चित्रपटांमध्ये शिक्षक, सामाजिक कार्येकर्ते व विद्यार्थी असा स्थानिक कलाकारांनी उत्तम अभिनय केला. 'विराट १८'ला नगर विभागातून सर्वोत्कृष्ट लघुपटाचा पुरस्कार मिळाला. ‘दप्तऱ्या’, ‘विराट १८’ आणि ‘गुड्डू’ या चित्रपटांची अमेरिकेतील फेस्टिवलमध्येही निवड झाली. 

विद्यार्थ्यांच्या अभिनय कौशल्याला वाव : भाऊसाहेब चंदन  
माझ्या शिक्षक मित्र व विद्यार्थी यांचे यात सहकार्य लाभत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या अभिनय कौशल्याला वाव देण्यासाठी आणखी सामाजिक संदेश, जनजागृती करणारे ‘झीरो बजेट’ लघुपट निर्मिती करणार आहे. असे झीरो बजेट लघुपट निर्माते व प्राथमिक शिक्षक भाऊसाहेब चंदन हे म्हणाले.

आपला छंद जोपासताना विद्यार्थ्यांमध्येही अभिनय कौशल्य निर्माण करून प्रत्येक लघुपटातून समाजाला एक चांगला संदेश देणे हा त्यांचा प्रयत्न कौतुकास्पद व प्रेरणादायी आहे. 
- शिवाजी कराड, गट शिक्षणाधिकारी, नेवासे

संपादन : अशोक मुरुमकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com