सेल्फीच्या नादात पोलिस धबधब्यात पडला, अजूनही शोध सुरूच

सनी सोनावळे
Friday, 25 September 2020

या धबधब्याखाली वर्षानुवर्ष पाणी पडून खोलवर खाली जागा निर्माण झाली आहे. त्यामध्ये अनेक कपारीदेखील आहेत. पोहता येत नसल्याने पाण्यामधून निर्माण झालेल्या भोवऱ्यात दहीफळे अडकण्याची शक्यता स्थानिकांनी व्यक्त केली.

टाकळी ढोकेश्वर : मांडओहोळ (ता.पारनेर) येथील धरण परिसरात रूईचोंडा धबधब्यात रेल्वे पोलिस गणेश दहिफळे यांचा फोटोसेशनच्या नादात तोल गेल्याने पाण्यात बुडाल्याची घटना घडली आहे. गुरूवारी संध्याकाळपासून सुरू केलेले शोध कार्य सुरू आहे. २३ तास उलटूनही दहीफळे यांचा शोध अजूनही सुरूच आहे.

या बाबत माहिती अशी की, नगर येथील चार रेल्वे पोलीस कर्मचारी रूई चोंडा धबधबा या पर्यटन स्थळावर फिरण्यासाठी बंदी असतानाही या ठिकाणी भेट देण्यासाठी आले होते. यातील गणेश दहीफळे (रा.खरवंडी कासार ता.पाथर्डी) धबधब्याजवळ छायाचित्र काढण्यासाठी गेल्यानंतर तोल गेल्याने पाण्यात पडले होते.

पोहता येत नसल्याने या ठिकाणी पाण्याच्या प्रवाहाने तयार झालेल्या खोल जागेत अडकण्याची शक्यता स्थानिकांनी व्यक्त केली होती. याची माहीती मिळाताच तहसीलदार ज्योती देवरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांनी घटनास्थळी जाऊन मदतकार्य सुरू केले होते. एनडीआरएफच्या जवानांच्या माध्यमातून हे शोधकार्य सुरू आहे. अजूनही काहीच तपास लागलेला नाही.

या धबधब्याखाली वर्षानुवर्ष पाणी पडून खोलवर खाली जागा निर्माण झाली आहे. त्यामध्ये अनेक कपारीदेखील आहेत. पोहता येत नसल्याने पाण्यामधून निर्माण झालेल्या भोवऱ्यात दहीफळे अडकण्याची शक्यता स्थानिकांनी व्यक्त केली.

धोकादायक फलक लावण्याची गरज

मांडओहोळ धरण व रूईचोंडा धबधबा परीसरात अनेक अशा धोकादायक जागा आहेत की त्या ठिकाणी गेल्यानंतर मोठा अपघात होऊ शकतो. या धबधब्यावरवरून उडी मारणे ही अनेकवेळा धोकादायक ठरून काही जणांना जीव गमवावा लागला. इतर पर्यटन स्थळावर जसे धोकादायक जागेचे फलक असतात, तसे येथे लावण्याची स्थानिकांनी मागणी केली आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The selfie caused the police to fall into the waterfall