esakal | बेजबाबदारपणामुळे कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत, याचा अर्थ सरकारला जबाबदारी झटकता येणार नाही
sakal

बोलून बातमी शोधा

Anna Hazare

उपचाराअभावी रूग्णांचा मृत्यू होणे योग्य नाही. जनताही बेजबाबदारपणे वागत असल्याने रूग्ण संख्या वाढत आहे. याचा अर्थ सरकारला जबाबदारी झटकता येणार नाही, असे प्रतिपादन जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केले.

बेजबाबदारपणामुळे कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत, याचा अर्थ सरकारला जबाबदारी झटकता येणार नाही

sakal_logo
By
मार्तंड बुचुडे

पारनेर (अहमदनगर) : राज्यात कोरोना रूग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. रूग्णांना ऑक्सिजन, बेड मिळत नाही ही दुर्दैवाची बाब आहे. त्यामुळे अनेकांचा मृत्यू झाला आहे. सरकारने तातडीने योग्य ती कार्यवाही करणे गरजेचे आहे. उपचाराअभावी रूग्णांचा मृत्यू होणे योग्य नाही. जनताही बेजबाबदारपणे वागत असल्याने रूग्ण संख्या वाढत आहे. याचा अर्थ सरकारला जबाबदारी झटकता येणार नाही, असे प्रतिपादन जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केले.

मार्चमध्ये कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊन करण्यात आले. मात्र लॉकडाऊन उठवल्यानंतर कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या अतिशय मोठ्या प्रमाणात शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातही  रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. अशा स्थितीत जनतेची जबाबदारी आहे की, आपण स्वत:ची काळजी स्वत: घेतली पाहिजे. अत्यंत गरजेचे काम असेल तरच घराबाहेर पडावे. बाहेर पडताना पुर्णपणे काळजी घ्यावी. आपली व कुटुंबाची काळजी घेणे ही ज्याची त्याची जबाबदारी आहे. मात्र जनता बेजबाबदारपणे वागत आहे, विनाकारण घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे ही मंडळी कोरोनाला जणू निमंत्रणच देत आहेत, असेही हजारे म्हणाले. असे असले तरी सुद्धा याचा अर्थ सरकारला जबाबदारी झटकता येणार नाही.

सरकारने रूग्ण संख्या वाढत आहे, यासाठी वाढीव रूग्णालये उभारणे गरजेचे आहे. ऑक्सिजन बेड किंवा औषोधोपचार मिळाला नाही. त्यामुळे कोणत्याही स्थितीत कोरोना रूग्णास मृत्यू येऊ नये. यासाठी सरकारी यंत्रणेने काळजी घेणे गरजेचे आहे. वाढत्या रूग्णसंख्येमुळे सरकारी यंत्रणेवर ताण आला आहे, हे खरे आहे. हे जरी खरे असले तरी सरकारने आगामी काळात रूग्ण संख्या वाढणार आहे, याचा विचार करून शहरी भागासह ग्रामीण भागात रूग्णालये उभारणे गरजेचे आहे किंवा खाजगी रूग्णालये ताब्यात घेणे आवश्यक आहे. 

कोरोनावर लवकर लस येईल अशी चिन्ह सध्या तरी दिसत नाही. कोरोना रूग्णांना पैसे देऊनही उपचाराअभावी मृत्यू येत असेल तर ते योग्य नाही. त्यासाठी सरकारी पातळीवर तातडीने कोरोना उपचारासाठी लागणारी औषधे तसेच ऑक्सिजन बेड, कोरोना टेस्टसाठी लागणारी किट पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून  देणे गरजेचे आहे, असे ही शेवटी हजारे यांनी 'सकाळ'शी बोलताना सांगितले. 

संपादन : सुस्मिता वडतिले

loading image
go to top