esakal | नवल वाटेल पण हे खरंय, खास बिबट्यांसाठी बनतोय हायवे!

बोलून बातमी शोधा

Separate road for leopards on Nashik-Pune National Highway

मानवी वस्तीच्या आसपास 200 मीटर परिसरात बेमालूमपणे लपण्याच्या त्याच्या नैसर्गिक सवयीमुळे हा परिसर बिबट्यांचा सुरक्षित अधिवास झाला आहे.

नवल वाटेल पण हे खरंय, खास बिबट्यांसाठी बनतोय हायवे!
sakal_logo
By
आनंद गायकवाड

संगमनेर ः देशात स्वातंत्र्यानंतर आजही खेडे गावातील रस्ते हरवले आहेत. वाड्या-वस्त्यांची बात सोडा मोठी शहरेही चांगल्या रस्त्यांपासून वंचित आहेत. हा देशातील प्रगतीचा आलेख असला तरी आपण तसे भूतदया मानणारे आहोत. त्यामुळे सर्व प्राणीमात्रांचा विचार करावा लागतो. मानवी वस्तीत सर्रास आढळणाऱ्या बिबट्यासाठी स्वतंत्र मार्ग बनविण्यात येणार आहे. 

वन विभागाने तसे सर्वेक्षण सुरूय. या प्रकल्पासाठी चार ठिकाणी सर्वेक्षण करण्यात आले आहे. बिबट्याच्या स्वतंत्र मार्गासाठी थेट दखल राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि राज्याच्या अप्पर मुख्य वनसंरक्षकांनी घेतली.

या महामार्गावरील बिबट्यांचा अपघाती मृत्यू टाळण्यासाठी ठोस उपाय योजनांचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश संगमनेरच्या वन्यजीव विभागाला बजावला.

केंद्र सरकारच्या पथकाकडून पाहणी

केंद्र सरकारचे अप्पर मुख्य वनसंरक्षक अंबाडे, नाशिक विभागाचे मुख्य वनसंरक्षक अंजनकर, संगमनेर विभागाचे उपविभागीय वनसंरक्षक गणेश ढोरे, भाग एकचे वनक्षेत्रपाल नीलेश आखाडे व घारगाव वन परिमंडलाचे अधिकारी रामदास थेटे यांनी संगमनेर तालुक्यातील कर्‍हे घाट ते आळे खिंड या पन्नास किलोमीटरच्या क्षेत्रातील बिबट्यांसह वन्यजीवांचे सर्वाधिक बळी गेलेल्या ठिकाणांची पहाणी केली.

त्याचे असे आहे ः प्रवरा नदीकाठच्या समृध्द बागायती पट्ट्यात गेल्या काही वर्षांपासून बिबट्यांची संख्या वाढते आहे. मार्जार कुळातला हा प्राणी पिण्याचे पाणी, भक्ष्याची उपलब्धता व लपणासाठी सुरक्षित जागा या निकषांमुळे प्रवरा नदीकाठच्या पट्ट्यात चांगलाच स्थिरावला आहे.

शेतकऱ्यांकडे बिबट्याचे खाद्य

गेल्या काही वर्षांत साखर कारखान्यामुळे मोठ्या प्रमाणात उसाचे क्षेत्र तसेच डाळींब, द्राक्षांच्या बागा ही लपणासाठी आदर्श ठिकाणे व वाड्या वस्त्यांवरील मानवी रहिवाश्यांमुळे त्याला आवडणारे कुत्रे, बकरी, मेंढी व छोटी वासरे आदी भक्ष्याच्या सहज उपलब्धतेमुळे या परिसरात बिबट्यांची घनता वाढली आहे.

मानवी वस्तीच्या आसपास 200 मीटर परिसरात बेमालूमपणे लपण्याच्या त्याच्या नैसर्गिक सवयीमुळे हा परिसर बिबट्यांचा सुरक्षित अधिवास झाला आहे. उसाच्या शेतात जन्माला आलेली बिबट्यांची नवीन पिढी मानवी अस्तित्वाला घाबरेनाशी झाल्याने त्यांचा उपद्रवही वाढला आहे.

हायवेमुळे आले गंडांतर

तालुक्यातून जाणाऱ्या व दोन महानगरांना जोडणाऱ्या नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गाची चार वर्षांपूर्वी निर्मिती झाली. या मार्गावरुन भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनांची संख्याही वाढली आहे. परिणामी पूर्वीच्या तुलनेत अधिक बिबटे रस्ते अपघातात मृत्यूमुखी पडले आहेत. 

हे आहेत ते स्पॉट

राष्ट्रीय महामार्गावर ओलांडताना बिबट्याचा वाहनांच्या धडकेने मृत्यू होतो. ती ठिकाणे वन विभागाने शोधली आहेत. कर्‍हे घाट, एकल घाट, ब्राह्मण ज्योती (आंबीखालसा फाटा ) आणि माळवाडी या चार ठिकाणी बिबट्यांसाठी भुयारी मार्ग आणि पाणवठे केले जाणार आहेत. महामार्गावर तालुक्याच्या संपूर्ण हद्दीत ज्या ठिकाणाहून बिबटे अथवा अन्य वन्यजीव रस्ता ओलांडण्याची शक्यता आहे, तेथे ‘बिबटेप्रवण क्षेत्र, वाहने सावकाश चालवा’ असे सूचना फलक लावले जाणार आहेत. खरे तर बिबट्यांसाठी स्वतंत्र हायवेच आहे.

वन्यजीव वाचतील

भुयाराच्या दोन्ही बाजूला पाणवठेही निर्माण करण्याचा प्रस्ताव आहे. त्यामुळे पाण्याच्या शोधासाठी थेट महामार्गावर येण्याचे वन्यप्राण्यांचे प्रमाण कमी होईल. त्यांचा जीव वाचवण्यासाठी मोठी मदत मिळेल, अशी वन विभागाला अपेक्षा आहे. ही संकल्पना लवकरात लवकर राबविण्याचा विचार आहे. त्यातून वन्यजीवांच्या अपघातांवर निश्चितच नियंत्रण मिळवता येईल, असा विश्वास संगमनेरचे वनक्षेत्रपाल नीलेश आखाडे यांनी व्यक्त केला आहे.

संपादन - अशोक निंबाळकर