पुण्यातच नाही तर नगरमध्येही आहे शनिवारवाडा, बांधकामासाठी वापरले तेथीलच साहित्य

सनी सोनावळे
Saturday, 17 October 2020

पेशव्यांनी शनिवारवाड्याच्या बांधकामावेळी नाशिकच्या जंगलातून सागाच्या लाकडांसह अन्य साहित्याची खास जबाबदारी नारो बाबाजी व नारो शंकर या दोन भावंडांवर सोपविली होती. त्यांनी ती चोख बजावल्याने त्यांना कान्हूर गावाची जहागिरी बहाल करण्यात आली.

टाकळी ढोकेश्वर : पुण्यातील शनिवारवाड्याविषयी अनेक कथा आणि दंतकथा जोडल्या आहेत. ही वास्तू बांधकामाचा उत्कृष्ट नमुना आहे. आजही ही वास्तू पेशवेकाळातील वैभवाची साक्ष देते. परंतु अशीच एका वास्तू नगर जिल्ह्यात आहे. तिच्या बांधकामाची कथा रंजक आहे.

पुण्याच्या शनिवारवाड्याची प्रतिकृती असलेल्या, कान्हूर पठार (ता. पारनेर) येथील ऐतिहासिक सरकारवाड्यात गवत, झाडे-झुडपे वाढून दुर्दशा झाली होती. गावातील तरुणांनी साफसफाई करून नुकताच हा परिसर स्वच्छ केला. 

पेशव्यांनी शनिवारवाड्याच्या बांधकामावेळी नाशिकच्या जंगलातून सागाच्या लाकडांसह अन्य साहित्याची खास जबाबदारी नारो बाबाजी व नारो शंकर या दोन भावंडांवर सोपविली होती. त्यांनी ती चोख बजावल्याने त्यांना कान्हूर गावाची जहागिरी बहाल करण्यात आली.

पुढे या दोन्ही भावांनी आपल्या कर्तृत्वावर पेशव्यांच्या मुख्य सरदारकीपर्यंत मजल मारली. पेशव्यांनी दिल्ली काबीज केल्यानंतर लाल किल्ल्याचे किल्लेदार म्हणून नारो शंकर यांची नेमणूक केली. त्याच वेळी, नगरच्या भुईकोट किल्ल्याची जबाबदारी नारो बाबाजी यांच्याकडे होती.

नारो बाबाजींनी शनिवारवाड्यातील शिल्लक साहित्यातून गावात शनिवारवाड्याप्रमाणे बांधकाम करण्याचे ठरविले. त्यातून उभा राहिला सरकारवाडा. या वाड्याला सहा बुरूज आहेत. दिवाणखाना, भुयारे, मोठे चौक बांधण्यात आले. पेशवाईचा व नगरकरांच्या सुवर्णकाळाचा साक्षीदार असलेला हा सरकारवाडा आज मात्र अखेरच्या घटका मोजत आहे.

हा ऐतिहासिक ठेवा जतन करण्याची मागणी होत आहे. किमान आहे त्या स्थितीत तरी हा वाडा जगावा, यासाठी विजय काकडे, रायचंद ठुबे, चंद्रभान ठुबे, सुनील भालेकर, किशोर ठुबे, अशोक ठुबे, अक्षय लोंढे, अमित लोंढे, प्रशांत लोंढे, तुषार सोनावळे, शुभम ठुबे, बाळासाहेब लोंढे यांनी वाड्यात व आसपासच्या परिसराची स्वच्छता केली. यासाठी देवदत्त गोडबोले यांनी मार्गदर्शन केले. 

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shaniwarwada is located in Ahmednagar