शरद पवारांनी घेतली आमदार नीलेश लंकेंच्या कामाची दखल, काय केलंय त्यांनी असं?

मार्तंड बुचुडे
Friday, 16 October 2020

तिचा उपयोग पारनेर -नगर मतदार संघातील जनतेला चांगला होणार आहे. आज पुणे येथे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते या अत्याधुनिक रुग्णवाहिकेची चावी आमदार लंके यांना देण्यात आली.

पारनेर ः पारनेर-नगर विधानसभा मतदार संघासह तालुक्यातील कोरोना रूग्णांसाठी दोन महिन्यांपूर्वी आमदार नीलेश लंके यांनी एक 1 हजार बेडचे कोविड केअर सेंटर सुरू केले.

या ठिकाणी नगर जिल्ह्यासह व पुणे जिल्ह्यातील सुमारे एक हजार सहाशे साठ रूग्णांना मोफत उपचार मिळाला. त्यामुळे आमदार नीलेश लंके यांच्या कार्याची दखल घेत शरदचंद्रजी पवार आरोग्य मंदिर या नावाने सुरू केलेली आरोग्यसेवा अधिक गतिमान व्हावी व रूग्णांची सोय व्हावी यासाठी शरद पवार यांनी लंके यांच्या मागणीनुसार अत्याधुनिक कार्डियाक रूग्णवाहिका दिली.

तिची चावी आज (ता. 16 ) पुणे येथे आमदार लंके यांना देण्यात आली.
ग्रामीण भागातील जनतेची आरोग्याची चांगली सोय व्हावी. त्यांना तात्काळ उपचाराची सुविधा मिाळावी तसेच रूग्णालयापर्यंत आजारी व्यक्तीला तात्काळ जाता यावे या हेतूने ही रूग्णवाहिका देण्यात आली आहे.

तिचा उपयोग पारनेर -नगर मतदार संघातील जनतेला चांगला होणार आहे. आज पुणे येथे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते या अत्याधुनिक रुग्णवाहिकेची चावी आमदार लंके यांना देण्यात आली.

या वेळी ॲड.राहुल झावरे, नीलेश लंके प्रतिष्ठानचे कारभारी पोटघन, भैरवनाथ देवस्थानचे अध्यक्ष सचिन पठारे, अरुण पवार, अभय नांगरे, सचिन साठे, संतोष ढवळे, दादा दळवी, संदीप चौधरी, शिवाजी शिंदे आदी उपस्थित होते.

कोरोना संकटात सर्वसामान्य जनतेला वेळेत व योग्य आणि कमी मोफत उपचार मिळावेत रूग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून आमदार लंके यांनी कर्जुले हर्या या ठिकाणी शरदचंद्रजी पवार आरोग्य मंदिर या नावाने कोविड केअर सेंटर सुरू केले. या ठिकाणी लोकसहभागातून रूग्णांसाठी सर्वप्रकारच्या सोयी उपलब्ध करूण दिल्या आहेत.

राज्यासाठी हे आरोग्य मंदिर आदर्शवत ठरले आहे. पवार यांनी कोविड केअर सेंटरबाबत माहिती घेतल्यानंतर याठिकाणी कशाची गरज आहे, असा प्रश्न विचारला त्या वेळी रुग्णवाहिकेची गरज असल्याचे लंके यांनी सांगितले होते. त्यानुसार ही रूग्णवाहिका देण्यात आल्याचेही लंके यांनी सांगितले.

संपादन - अशोक निंबाळकर 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sharad Pawar took notice of the work of MLA Nilesh Lanka