अकोले नगरपंचायतीवर प्रशासक; उपविभागीय अधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांची नियुक्ती

शांताराम काळे
Thursday, 26 November 2020

अकोले नगरपंचायतीच्या नगरसेवकांचा कार्यकाळ संपला असुन गुरुवारपासून नगरपंचायतीत प्रशासक राज सुरु झाले.

अकोले (अहमदनगर) : अकोले नगरपंचायतीच्या नगरसेवकांचा कार्यकाळ संपला असुन गुरुवारपासून नगरपंचायतीत प्रशासक राज सुरु झाले. उपविभागीय अधिकारी डॅा. शशिकांत मंगरुळे यांची प्रशासक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

अकोले नगरपंचायतीत २०१५ ते २०२० कार्यकाळातील नगराध्यक्ष, नगरसेवक, यांचा पाच वर्षाचा  कार्यकाळ बुधवार (ता. २५) संपुष्टात आला आहे. तर पुढील नवनिर्वाचीत पदाधिकाऱ्याचे पहिली बैठक होईपर्यत नगरपंचायतला प्रशासक म्हणून संगमनेर उपविभागीय अधिकारी डॅा. शशिकांत मंगरूळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 
अकोले नगरपंचायत निवडणुकीचे रणशिंग फुकले आहे.

नगरपंचायत निवडणूक कार्यक्रमाला सुरुवात झाली असुन प्राथमिक  प्रभाग व आरक्षण सोडत जाहीर झालेली आहे.या आरक्षण व प्रभाग रचनेवर हरकतीची मुदतही आज गुरूवारी संपली. २४ डिसेंबर २०२० अंतिम आरक्षण व प्रभाग रचना जाहीरपणे होणार आहे. यानंतर निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता असून फेब्रुवारी अथवा मार्चमध्ये सार्वत्रिक निवडणूक होण्याची दाट शक्यता आहे.तर ही निवडणूक होऊन नविन नगरसेवकांच्या पहील्या बैठकी पर्यत नगरपंचायत चा कारभार प्रशासक म्हणून डॅा.शशिकांत मंगरुळे पाहणार आहेत.

अकोले नगरपंचायत सार्वत्रिक  निवडणूक २०२० चा बिगुल वाजला असुन या निवडणूकीत शहरातील सर्व  १७ प्रभागात इच्छुकांची धावपळ सुरु झाली आहे.सर्वच राजकीय पक्षानी निवडणुकीत सद्या तरी स्वबळाचा नारा दिला आहे.कारण त्यामुळे आपल्या पक्षातील कार्यकर्त्याला उमेदवारी देणे शक्य होणार आहे.आघाडी झाली तर मात्र काँग्रेस,राष्ट्रवादी व शिवसेना पक्षाला मात्र इच्छुक उमेदवारांची नाराजी ओढून घ्यावी लागणार आहे.तसेच स्वबळावर  किंवा आघाडी झाल्यावर निवडणूक लढण्याची शक्यता झाली तर नेत्यांच्या मुलांना संधी मिळते की सर्व सामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी मिळते. यावरही निवडणूक निकाल अवलंबून राहणार आहे.

अर्थात अजून दोन ते महिन्यात बरेच पाणी वाहून जाणार आहे त्यामुळे निवडणूक जाहीर झाल्यानंतरच कळेल. महाविकास आघाडी विरूद्ध भाजप लढणार कि सर्व  पक्ष स्वबळावर वेगवेगळे लढणार? हे त्यावेळी समजेल.इतके मात्र नक्की की, ही निवडणूक अनेकांचे अंदाज चुकविणारी ठरवणार आहे.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shashikant Mangrule elected as Administrator of Akole Nagarpanchayat