उगच म्हणत नाहीत ‘गाव करी ते न राव करी’; म्हणून त्यांनी तब्बल पाच बंधारे दुरुस्त

विलास कुलकर्णी
शनिवार, 1 ऑगस्ट 2020

शेरी- चिखलठाण येथे गेल्यावर्षी पावसाळ्यात ढगफुटी सदृश्य पावसामुळे पाच बंधारे फुटले. ग्रामस्थांनी ११ लाख रुपये लोकवर्गणी केली. फुटलेल्या एका बंधाऱ्याची दुरुस्ती केली. 

राहुरी (अहमदनगर) : शेरी- चिखलठाण येथे गेल्यावर्षी पावसाळ्यात ढगफुटी सदृश्य पावसामुळे पाच बंधारे फुटले. ग्रामस्थांनी ११ लाख रुपये लोकवर्गणी केली. फुटलेल्या एका बंधाऱ्याची दुरुस्ती केली. एक बंधारा नवीन बांधला. दीड महिन्यापूर्वी लोकसहभागातून दोन बंधारे तयार झाले. पाठोपाठ जोरदार पाऊस सुरु झाला. महिनाभरात दोन्ही बंधारे तुडुंब भरले. ग्रामस्थांच्या पुढाकाराने जलसंधारणाचे काम मार्गी लागले.

शेरी- चिखलठाण येथे ४ नोव्हेंबर 2019 रोजी अती मुसळधार पाऊस कोसळला. जिरेदरा व कुरणदरा येथे प्रसाद तनपुरे यांनी २० वर्षांपूर्वी जलसंधारणासाठी बांधलेले चार व लोकवर्गणीतून बांधलेला एक असे पाच बंधारे फुटले. कुरणदरा ओढ्याला महापूर आला. ओढ्याचे पात्र सोडून पाणी शेतजमिनींमधून चिखलठाण येथे मुळा नदीपात्रात गेले. 

ओढ्याच्या दुतर्फा १० किलोमीटर शेतजमीनी मातीसह खरडून उभ्या पिकांसह वाहून गेल्या. काही ठिकाणी दहा- वीस फूट व्यासाचे, अडीच- तीन फूट खोलीचे खड्डे तयार झाले. काही ठिकाणी तीन फुटापर्यंत उंचीची माती जमा झाली. जमिनी नापीक झाल्या. पंचनामे झाले. बंधाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी कागदपत्रे रंगली. परंतु, लाल फितीत अडकली. अतिवृष्टीमुळे पिकांच्या नुकसानीची अल्पशी मदत मिळाली. परंतु, खरडून नापिकी झालेल्या शेतजमिनींच्या नुकसानीची मदत शेतकऱ्यांना अद्याप मिळाली नाही. 

बंधाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी सरकारच्या निधीची वाट न पाहता ग्रामस्थांनी ११ लाख रुपये वर्गणी जमविली. त्यातून एका बंधाऱ्याची दुरुस्ती केली. देवळाली प्रवराचे नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी मोफत पोकलेन दिले. त्याचा डिझेल खर्च वर्गणीतून करून, नवीन बंधारा बांधला. दोन्ही बंधारे दोन दिवसांपूर्वी तुडुंब भरले. जलसंधारणामुळे आसपासच्या विहिरी व कूपनलिकांचा जलस्त्रोत बळकट झाला. ग्रामस्थांचा पाणी प्रश्न मिटला.

ग्रामस्थांच्या पुढाकाराने दोन बंधारे उभे राहिले. आता शासनाची जबाबदारी आहे. उर्वरित चार बंधाऱ्यांच्या कामासाठी निधी मिळावा. मागील वर्षी ढगफुटी सदृश्य पावसामुळे शेतजमिनींचे अतोनात नुकसान झाले. त्याचे पंचनामे झाले. त्याची नुकसान भरपाई मिळावी. 
- डॉ. सुभाष काकडे, सरपंच, शेरी- चिखलठाण 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sheri Chikhalthan village in Rahuri taluka repaired the embankment