शेवगावमधील क्रांती चौकात सात तास सुरु होते घंटानाद आंदोलन

सचिन सातपुते
Wednesday, 5 August 2020

शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतांना नगरपरीषद नागरी प्रश्नांसंदर्भात गांभीर्याने घेत नाही. पावसामुळे शहरातील रस्त्यांवर पाणी साचून त्यांना गटाराचे स्वरुप आले आहे. त्यामुळे विविध साथीच्या आजारामध्ये वाढ झाली आहे. त्यातच कोरोनाचा संसर्गही शहरात मोठया प्रमाणात वाढत चालला असून नागरीकांमध्ये घबराटीचे वातावरण तयार झाले आहे.

शेवगाव (नगर) : नगरपरीषदेच्या गलथान कारभारामुळे शहरात ठिकठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरले असून कोरोनाचा संसर्गही वाढत चालला आहे. याबाबत नगरपरीषदेने स्वच्छता मोहीम न राबवावी यामागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय कम्युनिष्ठ पक्ष, इंदिरा काँग्रेस, शाहू, फुले, आंबेडकर सामाजिक विचार वंचाच्या वतीने नगरपरीषदेला जाग आणण्यासाठी आज बुधवारी शहरातील क्रांती चौकात सुमारे सात तास घंटानाद आंदोलन करण्यात आले. 

शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतांना नगरपरीषद नागरी प्रश्नांसंदर्भात गांभीर्याने घेत नाही. पावसामुळे शहरातील रस्त्यांवर पाणी साचून त्यांना गटाराचे स्वरुप आले आहे. त्यामुळे विविध साथीच्या आजारामध्ये वाढ झाली आहे. त्यातच कोरोनाचा संसर्गही शहरात मोठया प्रमाणात वाढत चालला असून नागरीकांमध्ये घबराटीचे वातावरण तयार झाले आहे. शहराला नियमित पाणी पुरवठा होत असल्याने ऐन पावसाळ्यात नागरीकांच्या समस्येत वाढ होत आहे. 

नगरपरीषदेने तुंबलेली गटारे साफ करावीत, रस्त्यावरील खड्डे बुजवून प्रत्येक प्रभागात औषध फवारणी करावी, नियमित शुध्द पाणी पुरवठा करावा, भाजी विक्रेत्यांना महात्मा फुले भाजी मंडईत हक्काची जागा उपलब्ध करुन दयावी आदी उपाययोजना त्वरीत कराव्यात. यासाठी आज विविध मागण्यांचे फलक घेवून तब्बल सात तास घंटानाद आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाची नगरपरीषदेने दखल न घेतल्याने आंदोलक आक्रमक झाले होते. 

या आंदोलनात संजय नांगरे, कमलेश लांडगे, वहाब शेख, प्रविण भारस्कर, कृष्णा सातपुते, संतोष जाधव, अक्षय खोमणे, तोफेल शेख, गुड्डू काझी, रविंद्र लांडे आदींसह ग्रामस्थ सहभागी झाले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय फडके, जिल्हा परीषद सदस्या हर्षदा काकडे, कम्युनिष्ठ पक्षाचे राज्याचे सचिव अँड. सुभाष लांडे आदींनी आंदोलन स्थळी भेट देवून पाठींबा दिला. 

संपादन - सुस्मिता वडतिले 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Shevgaon a bell ringing agitation was held at Kranti Chowk against the Municipal Council regarding various demands