esakal | शेवगाव- पांढरीपूल रस्त्यावरील माळेगाव फाटा येथील चौफुल्यावर अपघाताची मालिका
sakal

बोलून बातमी शोधा

Shevgaon Pandharipul Accident continues on the crossroads at Malegaon Fata

शेवगाव पांढरीपूल रस्त्यावरील मळेगाव फाटा येथील चौफुलीवर अपघातांची मालिका सुरु आहे.

शेवगाव- पांढरीपूल रस्त्यावरील माळेगाव फाटा येथील चौफुल्यावर अपघाताची मालिका

sakal_logo
By
राजू घुगरे

अमरापूर (अहमदनगर) : शेवगाव पांढरीपूल रस्त्यावरील मळेगाव फाटा येथील चौफुलीवर अपघातांची मालिका सुरु आहे. त्यामध्ये आतापर्यंत चार जणांचा बळी गेला आहे. अनेकजण जखमी झाले आहेत. याबाबत ग्रामपंचायतीने रस्त्यावर गतिरोधक टाकण्याची मागणी केली आहे.

मळेगाव (ता. शेवगाव) येथील शेवगाव पांढरीपूल रस्त्यावरील दोन दिवसापूर्वी झालेल्या अपघातात तेलकुडगाव येथील एक जणाचा बळी गेला. शेवगावहून नगरकडे जाणाऱ्या भरधाव वेगात असणाऱ्या वाहनाने संबंधीत मृत झालेल्या व्यक्तीच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. यापूर्वी ही याच ठिकाणी दोन तीन वर्षात तीन जणांचा बळी घेतला आहे. या ठिकाणी भातकुडगाव- आव्हाणे- शेवगाव- पांढरीपुलाकडे जाणारे चार रस्ते एकत्र येतात.

रस्त्यावर सर्व बाजूनी वेडयाबाभळीची झुडपे वाढलेली असल्याने येणाऱ्या वाहनांना कोणत्याही बाजूने येणारे वाहन दिसत नाही. त्याबाबतचा सुचना फलकही तेथे लावलेला नाही. त्यामुळे शेवगाव नगर रस्त्यावरील वाहतुक भरधाव सुरु असते. अशा वेळी भातकुडगाव किंवा आव्हाणे या बाजूने एखादे वाहन आल्यास वाहन चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून अपघात घडतो. निद्रिस्त आव्हाणे गणपती देवस्थान तेथून जवळच असल्याने या रस्त्याने येणाऱ्या भाविकांची संख्याही खुप असते. अशावेळी वारंवार अपघात घडत असल्याने हा रस्ता म्हणजे मृत्यूचा सापळा बनला आहे.

या रस्त्यावर चारही बाजूने सुचना फलक लावून गतिरोधक टाकण्याची मागणी मळेगाव ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभाग शेवगाव यांच्याकडे केली आहे. मात्र त्यास आतापर्यंत मुहूर्त लागलेल्या नसल्याने त्या रस्त्यावर निष्पाप लोकांचे हाकनाक बळी जात आहेत. त्यामुळे या चौफुलीवर त्वरीत गतिरोधक बसवावेत अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

मळेगावचे सरपंच मंगल रघुनाथ सातपुते म्हणाले, चौफुलीवर वारंवार अपघात होत असल्याने किमान दोन बाजूने रस्त्यावर गतिरोधक बसवावेत. अशी लेखी मागणी ग्रामपंचायतीने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे दोन वर्षापूर्वी केलेली आहे. त्याबाबत वारंवार स्मरण पत्र ही दिलेले आहे. मात्र बांधकाम विभागाचे अधिकारी त्यास दाद देत नाहीत.

संपादन : अशोक मुरुमकर