esakal | पिसळलेल्या कुत्र्याने घेतला पाच लहान मुलांना चावा
sakal

बोलून बातमी शोधा

In Shevgaon taluka seven children were bitten by a dog

शेवगाव शहरात तीन दिवसापासून पिसळलेल्या कुत्र्याने उच्छांद मांडला असून पाच ते सात लहान मुलांना चावा घेतला आहे.

पिसळलेल्या कुत्र्याने घेतला पाच लहान मुलांना चावा

sakal_logo
By
सचिन सातपुते

शेवगाव (अहमदनगर) : शेवगाव शहरात तीन दिवसापासून पिसळलेल्या कुत्र्याने उच्छांद मांडला असून पाच ते सात लहान मुलांना चावा घेतला आहे. त्यामुळे दोन ते तीन दिवसापासून शहरात पिसाळलेल्या कुत्र्याची दहशत निर्माण झाली आहे. नगरपालिकेनी या कुत्र्याचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरीकांनी केली आहे.

पिसाळलेल्या कुत्र्यांनी शेवगाव शहरातील मुख्य बाजार पेठ, शिवाजी चौक, कुरेशी गल्ली, नेवासे रस्त्यासह अनेक भागात तीन दिवसापासून धुमाकूळ घातला आहे. नेवासे रस्त्यावरील पेट्रोल पंपासमोरील लांडे वस्तीवर राहणारा श्रेयस मनोज लांडे (वय ६) हा गुरुवारी (ता. १) घरासमोरील अंगणात खेळत असतांना पिसाळलेल्या कुत्र्याने त्यावर हल्ला करत सर्व अंगावर चावा घेतला.

घरातील व्यक्तींनी त्यास कुत्र्याच्या तावडीतून सोडवून दवाखान्यात दाखल केले. मात्र सरकारी दवाखान्यात यावरील रँबीज लस उपलब्ध नसल्याने त्यांना खाजगी दवाखान्यात उपचार करण्यासाठी नगर येथून आणावी लागली. त्यानंतर शुक्रवारी (ता. २) शहरातील शिवाजी चौक येथील मुलगा उमर शहानवाज कुरेशी (वय- ७) व दारुवाला गल्लीतील अजवा आबुबकर शेख (वय- ८) या मुलीला ही पिसाळलेल्या कुत्र्यांनी चावा घेतला. अजवा या मुलीस कुत्र्याने चेहऱ्यावर व पायावर चावा घेवून गंभीर जखमी केले आहे. यो दोन्ही मुलावर शेवगाव येथील खाजगी दवाखान्यात उपचार सुरु आहेत. या व्यतिरीक्त शहरातील वेगवेगळ्या प्रभागातील अनेक जणांना पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतला असून शहरात दोन तीन दिवसात या कुत्र्यांची दहशत निर्माण झाली आहे. 

शहरात गेल्या काही दिवसापासून बेवारस व भटक्या कुत्र्यांची संख्या मोठया प्रमाणात वाढली असून मुख्य बाजार पेठेतून जाणा-या नागरीकांवर ते हल्ला करतात. एकटया दुकटया लहान मुलाला खेळतांना किंवा रस्त्याने जातांना गाठून चावा घेतात. त्यामुळे शहरातील या कुत्र्यांचा नगरपरीषदेने बंदोबस्त करावा अशी मागणी नागरीकांमधून होत आहे.

कोरोना संसर्गाचा कहर सर्वत्र सुरु असल्याने नागरीक आधीच त्रस्त आहेत. त्यातच शहरातील पिसाळलेल्या कुत्र्याच्या दहशतीमुळे नागरीकांना घराबाहेर पडणे जिकरीचे झाले आहे. कुत्रा चावल्यानंतर त्यावर उपचारासाठी असणारी अँन्टी रेबीजची लस शेवगाव येथे उपलब्ध नाही. त्यामुळे संबंधीतांच्या नातेवाईकांना ती थेट नगर येथून उपलब्ध करावी लागते. त्यासाठी मोठा खर्च येतो. कोरोना संसर्गाच्या काळात लहान मुलांना व नागरीकांना दवाखान्यात उपचार घेणे सुध्दा अडचणी ठरु लागले आहे.

संपादन : अशोक मुरुमकर

loading image