Sadashiv Lokhande : बंडखोर खासदार सदाशिव लोखंडे यांच्या मतदार संघात ठाकरे गटाकडून घोषणा बाजी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sadashiv Lokhande

Sadashiv Lokhande : बंडखोर खासदार सदाशिव लोखंडे यांच्या मतदार संघात ठाकरे गटाकडून घोषणा बाजी

राहुरी : टाकळीमिया येथे आज (शनिवारी) दुपारी दौऱ्यावर आलेले शिंदे गटाचे खासदार सदाशिव लोखंडे यांना ठाकरे गटाच्या शिवसैनिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. काळे झेंडे दाखवून निषेध करण्यात आला. घोषणाबाजी सुरू होताच खासदार लोखंडे यांनी काढता पाय घेतला. ठाकरे गटाच्या सात शिवसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

शिर्डी लोकसभा मतदार संघातील राहुरी तालुक्यातील ३२ गावांच्या दौऱ्यावर खासदार लोखंडे मतदारांच्या भेटीगाठी घेण्यासाठी फिरत आहेत. आज (शनिवारी) दुपारी दोन वाजता टाकळीमिया ग्रामपंचायत कार्यालयात खासदार लोखंडे यांनी मतदार व कार्यकर्त्यांची संवाद साधला. यावेळी शिंदे गटाचे श्याम गोसावी, अण्णासाहेब म्हसे, बाळासाहेब पवार, संपत महाराज जाधव, राजेंद्र देवकर, सुनील कराळे, बापूसाहेब शिर्के व इतरांनी "मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तुम आगे बढो. हम तुम्हारे साथ है." अशा घोषणा दिल्या.

शिंदे गटाच्या घोषणामुळे ठाकरे गटाचे शिवसैनिक संतप्त झाले. ठाकरे गटाचे शिवसेना उपतालुका प्रमुख राहुल चोथे, हमिद पटेल, राजेंद्र कासार, चंद्रकांत सगळगिळे, सचिन करपे, पपु करपे, बंडु कवाणे, रामा बर्डे, उमेश कवाणे, रमजान शेख, रवींद्र करपे, बाळासाहेब शिंदे, सुभाष चोथे यांनी खासदार लोखंडे यांच्या निषेधार्थ घोषणाबाजी सुरू केली. "आवाज कुणाचा, शिवसेनेचा. ५० खोके एकदम ओके. गद्दारांचे करायचे काय, खाली डोके वर पाय. उद्धव ठाकरे तुम आगे बढो. हम तुम्हारे साथ है. शिवसेना कुणाची, उद्धव ठाकरेंची." अशा घोषणांनी परिसर दुमदुमला. पोलीस प्रशासनाने ठाकरे गटाच्या शिवसैनिकांची धरपकड करून, त्यांना ताब्यात घेतले जात आहे.

यांना घेतले ताब्यात...!

खासदार लोखंडे यांच्याविरुद्ध घोषणाबाजी करणारे ठाकरे गटाचे शिवसैनिक राहुल सिताराम चोथे, सुभाष मघाजी चोथे, सचिन भाऊसाहेब करपे, हमीद राजमहंमद पटेल, विठ्ठल सोन्याबापू सूर्यवंशी, चंद्रकांत शरद सगळगिळे, सुनील रावसाहेब गव्हाणे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

टॅग्स :Shiv SenaAhmednagar