देशाच्या पश्‍चिम विभागात सर्वाधिक स्वच्छ शहराचा बहुमान ‘या’ शहराला

सतिश वैजापूरकर
Friday, 21 August 2020

स्वच्छ सर्वेक्षण अभियानात देशात दुसरा क्रमांक मिळविलेल्या शिर्डी नगरपंचायतीला लागोपाठ दुसऱ्यांदा राज्य सरकारचे 15 कोटींचे बक्षीस जाहीर झाले.

शिर्डी (अहमदनगर) : स्वच्छ सर्वेक्षण अभियानात देशात दुसरा क्रमांक मिळविलेल्या शिर्डी नगरपंचायतीला लागोपाठ दुसऱ्यांदा राज्य सरकारचे 15 कोटींचे बक्षीस जाहीर झाले.

देशाच्या पश्‍चिम विभागात सर्वाधिक स्वच्छ शहर, असा बहुमानही मिळाला. शहराच्या स्वच्छतेची समस्या कायमस्वरूपी सोडविण्यासाठी आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतलेला पुढाकार. त्यास तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला प्रतिसाद आणि त्यातून साईसंस्थानने स्वच्छता निधी देण्याची स्वीकारलेली जबाबदारी, याचे हे फलित आहे. 

साईसमाधी मंदिरामुळे देश-विदेशात प्रसिद्ध असलेल्या या शहराची कचराकोंडी ते 30 कोटी ही वैशिष्ट्यपूर्ण वाटचाल यामुळे सुकर झाली. विखे पाटील यांनी पुढाकार घेतल्यानंतर साईसंस्थानने शहरस्वच्छतेसाठी दरमहा 42 लाख रुपयांचा निधी देण्याची जबाबदारी स्वीकारली. येथेच शहरस्वच्छतेचा प्रश्न कायमचा सुटला. निधीची व्यवस्था झाल्यानंतर, एका नामांकित कंपनीला स्वच्छतेचा ठेका देण्यात आला. स्वच्छता कर्मचाऱ्यांची संख्या 60 वरून 160 पर्यंत वाढली. कचरा विलगीकरण आणि संकलनासाठी प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध झाले. 

रस्त्यावरील धूळ ओढण्यासाठी रोड स्वीपरसारख्या आधुनिक यंत्रांचा वापर झाला. त्यामुळे शहर आरशासारखे लख्ख झाले. देशपातळीवरील बक्षीस मिळविण्याचा मार्ग सुकर झाला. तत्कालीन मुख्याधिकारी सतीश दिघे यांचीही या अभियानात महत्त्वाची भूमिका राहिली. त्यांनी प्रशासनासह स्वच्छता यंत्रणेला शिस्त लावली. हॉटेल व्यावसायिक व रहिवाशांपर्यंत स्वच्छता अभियान पोचविले. त्यामुळे स्वच्छतेचा ठेका घेतलेल्या कंपनीचे काम आणखी सोपे झाले. पूर्वीच्या नगराध्यक्ष योगिता शेळके, विद्यमान नगराध्यक्ष अर्चना कोते व त्यांच्या सहकाऱ्यांच्या कार्यकाळात शहराला लागोपाठ दोन वेळा प्रत्येकी 15 कोटींची बक्षिसे मिळाली. 

नगरसेवक अभय शेळके व त्यांच्या सहकाऱ्यांनी झपाटल्यासारखे काम केले. त्यातून पहिल्यांदा शहराला स्वच्छ सर्वेक्षण अभियानात 15 कोटींचे बक्षीस मिळाले. दोन वर्षांपूर्वी देशपातळीवर तिसरा क्रमांक मिळाला होता. यंदा शहराला दुसऱ्या क्रमांकावर बढती मिळाली. बक्षीस जाहीर झाले त्या वेळी नगराध्यक्ष अर्चना कोते, उपनगराध्यक्ष मंगेश त्रिभुवन, मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे व तत्कालीन मुख्याधिकारी सतीश दिघे उपस्थित होते. 

शिर्डीचा अभिमान वाटतो : विखे 
आमदार विखे पाटील म्हणाले, ""शिर्डीत एरवी रोज 40 ते 45 हजार भाविक येतात. त्यामुळे स्वच्छतेचा भार नगरपंचायतीवर पडतो. भाविकांच्या हितासाठी साईसंस्थानने हा भार स्वीकारावा. तटस्थ तज्ज्ञांनी सुचविल्यानुसार, दरमहा 42 लाख रुपये नगरपंचायतीला स्वच्छता निधी म्हणून द्यावेत, अशी भूमिका तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापुढे मांडली. त्यांनी ती मान्य करून साईसंस्थानला सूचना केली. त्यामुळे हे शहर देशातील सर्वाधिक स्वच्छ शहर म्हणून ओळखले गेले. सलग दुसऱ्यांदा 15 कोटींचे बक्षीस मिळाल्याचा आमदार या नात्याने अभिमान वाटतो.'' 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shirdi is considered to be the cleanest city in the western part of the country