esakal | शिर्डीच्या नगराध्यक्ष अर्चना कोते यांचा राजीनामा, राजकीय समीकरणे गतिमान
sakal

बोलून बातमी शोधा

Shirdi mayor Archana Kote resigns

सलग दुसऱ्यांदा "स्वच्छ शहर' म्हणून शिर्डीचा देशपातळीवर नावलौकिक झाला. त्यातून कोते यांची कारकीर्द संस्मरणीय ठरली.

शिर्डीच्या नगराध्यक्ष अर्चना कोते यांचा राजीनामा, राजकीय समीकरणे गतिमान

sakal_logo
By
सतीश वैजापूरकर

शिर्डी ः नगराध्यक्ष अर्चना कोते यांनी आज पदाचा राजीनामा जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला. आता नगरपंचायत वर्तुळात नवा नगराध्यक्ष निवडण्याच्या हालचालींना सुरवात झाली आहे. 

आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी शहर स्वच्छतेचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी लक्ष केंद्रित केले. त्यामुळे मावळत्या नगराध्यक्ष अर्चना कोते यांना लाभलेल्या दीड वर्षाच्या कालखंडात नगरपंचायतीला स्वच्छ सर्वेक्षणाचे पंधरा कोटींचे बक्षीस मिळाले.

सलग दुसऱ्यांदा "स्वच्छ शहर' म्हणून शिर्डीचा देशपातळीवर नावलौकिक झाला. त्यातून कोते यांची कारकीर्द संस्मरणीय ठरली. साईसंस्थानने शहरस्वच्छतेसाठी निधी देण्याबाबतच्या महत्त्वाच्या निर्णयाची अंमलबजावणी सुरू राहिली. लॉकडाउन व त्यानंतर दिवाळीमुळे त्यांना अधिक कार्यकाळ लाभला.

यापूर्वीच्या नगराध्यक्ष योगिता शेळके यांच्या कार्यकाळातही शहराला स्वच्छ सर्वेक्षणाचे पंधरा कोटींचे बक्षीस मिळाले. हे बक्षीस स्वीकारण्याची संधी मावळत्या नगराध्यक्ष कोते यांना मिळाली. 

सतरापैकी सोळा नगरसेवक सत्ताधारी विखे गटाकडे आहेत. खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी नव्या नगराध्यक्षांच्या निवडीच्या पार्श्‍वभूमीवर हालचालींना सुरवात केली.

जिल्हाधिकाऱ्यांनी निवडीचा कार्यक्रम जाहीर करण्यापूर्वीच, सर्वानुमते एकच नाव नक्की करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू आहेत. मूळ भाजपचे असलेले शिवाजी गोंदकर, जगन्नाथ गोंदकर, अशोक गोंदकर व सुजित गोंदकर ही नावे सध्या चर्चेत आहेत.