शिर्डीच्या नगराध्यक्षा अर्चना कोते देणार आज राजीनामा

सतीश वैजापूरकर
Thursday, 19 November 2020

शिर्डी नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष अर्चना कोते या आज (ता. 19) आपल्या पदाचा राजीनामा जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करणार आहेत.

शिर्डी (अहमदनगर) : शिर्डी नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष अर्चना कोते या आज (ता. 19) आपल्या पदाचा राजीनामा जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करणार आहेत. या नगरपंचायतीवर आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांचे निर्विवाद वर्चस्व आहे. त्यांनी यापूर्वीच कोते यांना राजीनामा देण्याची सुचना केली होती. त्यानुसार हा राजीनामा देण्यात येईल.

नवा नगराध्यक्ष कोण याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. मुळ भाजपचे असलेले माजी उपनगराध्यक्ष शिवाजी गोंदकर यांचे नाव सध्या या शर्यतीत आघाडीवर असल्याची चर्चा आहे. माजी उपनगराध्यक्ष जगन्नाथ गोंदकर, गटनेते अशोक गोंदकर व सुजित गोंदकर ही नावे देखील नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत आहेत. 

अद्याप कुणाचेही नाव नक्की करण्यात आलेले नाही. आम्ही इच्छुक आहोत. असे यातील दोन नगरसेवकांनी सांगीतले. दिवाळीनंतर दिवाळी साजरी करू, तोपर्यत राजकीय फटाके फोडू नका, असे सुचक विधान एका जाहिर कार्यक्रमात करून खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी सर्व नगरसेवकांना सबुरीचा सल्ला दिला होता. त्यानंतर नगरपंचायत वर्तुळातील राजकीय हालचाली लगेचच थंडावल्या होत्या. आता दिवाळी झाल्यानंतर खासदार डॉ. विखे पाटील यांनी नगरपंचायतीच्या राजकारणाकडे बारीक लक्ष द्यायला सुरवात केली. नगरसेवकांची मते अजमावली जात आहेत. राजकीय हालचालींना दोन दिवसां पासून वेग आला आहे. 

काही दिवसांपूर्वी आमदार विखे पाटील यांनी नव्या नगराध्यक्ष निवडीचे संकेत दिले होते. हि निवड सर्वानुमते तसेच दिलेल्या शब्दानुसारच होईल. असे विधान केले होते. त्यामुळे नवा नगराध्यक्ष कोण याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. 

नगरपंचायतीत विखे गटाकडे सध्या सतरा पैकी सोळा असे संख्याबळ आहे. त्यामुळे सर्वानुमते नवा नगराध्यक्ष निवडला जाईल.आमदार विखे पाटील सांगतील तो नगराध्यक्ष होईल. अशी सध्याची परिस्थीती आहे. त्यादृष्टीने हालचाली देखील सुरू झाल्या आहेत. विद्यमान नगराध्यक्ष अर्चना कोते यांनी राजीनामा दिल्यानंतर जिल्हाधिकारी नव्या नगराध्यक्षांची निवड करण्याबाबतचा कार्यक्रम जाहिर होईल. त्यानंतर प्रत्यक्ष निवडीची प्रक्रीया सुरू होईल.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shirdi mayor Archana Kote will resign today