
कोविड प्रतिबंधक उपाययोजनांचे काटेकोर पालन करायचे. भाविकांना मुक्कामासाठी प्रवृत्त करायचे. शारीरिक अंतराचे पालन करून भाविकांसाठी विविध उपक्रम हाती घ्यायचे.
शिर्डी ः भाविकांच्या सुलभ साईदर्शनासह येथील ढासळत्या अर्थकारणाला चालना देण्यासाठी विविध उपाययोजना करण्याचा हा कठीण काळ आहे.
आर्थिक अरिष्ट राहिले बाजूला आणि फलनिष्पत्ती नसलेले वादविवाद केंद्रस्थानी येत आहेत. येत्या भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई येत्या 10 डिसेंबर रोजी साईसंस्थानने लावलेले विनंती फलक हटविण्यासाठी येथे येत आहेत. त्यांच्या विरोधात आज शिवसेनेचे महिला आघाडीच्या स्वाती सुनील परदेशी व मनसे महिला आघाडीच्या सुरेखा दत्तात्रेय कोते यांनी आक्रमक भूमिका घेतली.
शिवसेनेने त्यांच्या तोंडाला काळे फासण्याचा इशारा दिला, तर मनसेने उद्या (सोमवारी) शहरात ठिकठिकाणी हे फलक लावण्याचे ठरविले आहे. फलक हटवूनच दाखवा, असे थेट आव्हानच देसाई यांना दिले आहे.
खरे तर शिर्डीचे अर्थकारण सध्या नाजूक वळणावर आहे. साईमंदिर प्रदीर्घ काळ बंद राहिल्याने शहराची आर्थिक हानी झाली. पाडव्यापासून साईमंदिर दर्शनासाठी खुले झाले. रोज सरासरी आठ हजार भाविक येथे दर्शनासाठी येतात. पूर्वी दैनंदिन 50-60 लाख रुपयांचे उत्पन्न दानपेटीतून मिळायचे.
ते आता कुठे दैनंदिन दहा लाख रुपयांवर आले आहे. त्यात संस्थानच्या नित्याचा खर्च भागविणेही मुश्कील आहे. शहरातील बाजारपेठ तर बंद असल्यासारखीच स्थिती आहे. हा काळ कोविड संसर्गावर नियंत्रण ठेवून भाविकांना वेगाने आणि सुलभ साईदर्शन देण्यावर लक्ष केंद्रीत करण्याचा आहे.
कोविड प्रतिबंधक उपाययोजनांचे काटेकोर पालन करायचे. भाविकांना मुक्कामासाठी प्रवृत्त करायचे. शारीरिक अंतराचे पालन करून भाविकांसाठी विविध उपक्रम हाती घ्यायचे. दर्शनार्थी भाविकांची संख्या वाढविण्यासाठी, शहरात आणखी अनकुल वातावरण तयार करायचे.
ग्रामस्थांतर्फे भाविकांचे आगळ्या-वेगळ्या पद्घतीने स्वागत करता येईल का, याबाबत विचार करायचा. साईसंस्थानने भाविकांच्या स्वागतासाठी वेगवेगळ्या सुविधा निर्माण करून द्यायच्या, यासाठी पुढाकार घेण्याचा हा काळ आहे.
वादास विनाकारण महत्त्व
भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी शिर्डीत येऊन मंदिर परिसरातील एखादा विनंती फलक हटविण्याचा प्रयत्न केला, तर कायद्याच्या आधारे त्यांच्यावर कारवाई करण्यास साईसंस्थान समर्थ आहे. या वादास विनाकारण महत्त्व देऊ नये. शहरातील वातावरण भाविकांना येथे यावेसे वाटेल असे ठेवावे, अशी येथील जाणकारांची अपेक्षा आहे.