
या निवडणुकीत राष्ट्रवादी, कॉंग्रेस यांच्याबरोबर शिवसेनाही सक्रीयपणे रिंगणात उतरणार आहे
अहमदनगर : अहमदनगर जिल्हा सहकारी बॅंकेत निवडणुकीच्या माध्यमातून शिवसेनेने 'एन्ट्री' करण्यासाठी विविध मतदारसंघातून अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे या निवडणुकीत राष्ट्रवादी, कॉंग्रेस यांच्याबरोबर शिवसेनाही सक्रीयपणे रिंगणात उतरणार आहे.
बॅंकेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेच्यावतीने खासदार सदाशिव लोखंडे यांचे पुत्र चेतन लोखंडे यांनी अनुसूचित जाती-जमाती मतदार संघातून, अनिता रमाकांत गाडे यांनी महिला राखीव मतदार संघातून, माजी महापौर भगवान फुलसौंदर इतर मागासवर्गीय मतदार संघातून, तर पारनेर सेवा सोसायटी मतदार संघातून रामदास भोसले यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
या वेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे, जिल्हा परिषदेचे सदस्य संदेश कार्ले, माजी शहरप्रमुख संभाजी कदम, विक्रम राठोड, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, योगीराज गाडे, अनिल शिंदे, संतोष गेनप्पा, गणेश कवडे, काशिनाथ दाते, दत्ता जाधव आदींसह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
बॅंकेत संचालक असणे आवश्यक : लोखंडे
राज्यात शिवसेना सत्ताधारी पक्ष आहे. जिल्हा बॅंकेतही शिवसेनेचे संचालक असणे आवश्यक आहे. त्यासाठीच आता शिवसेनेच्या उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले आहेत. या उमेदवारांना अनेकांचे पाठबळ मिळेल, असा विश्वास खासदार सदाशिव लोखंडे यांनी व्यक्त केला.