शिवशाहिरांचे नगरशी अतूट स्नेहबंध

Shivshahir Babasaheb Purandare had a close relation with Ahmednagar district
Shivshahir Babasaheb Purandare had a close relation with Ahmednagar district

शिर्डी (जि. अहमदनगर) : तब्बल पाऊणशे वर्षे महाराष्ट्रातील तरुण पिढीला शिवचरित्राचे वेड लावणारे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे आणि नगर जिल्ह्याचे नाते जिवाभावाचे आणि कधीही न तुटणारे होते. या नात्याची एक जिवलग तार राहुरीचे सहकारातील मातब्बर नेते कै. अण्णा पाटील कदम हे होते, तर दुसरी तार होते कोपरगावचे कै. अण्णा बागूल. या दोन जिवलगांच्या मदतीने त्यांनी आपल्या तारुण्याची तीन वर्षे नगर जिल्ह्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रचारक म्हणून खर्ची घातली. एवढेच नाही, तर पुढे शिवचरित्र कथनाकडे वळाल्यानंतरही नगर जिल्ह्यातील जिवलगांच्या दुसऱ्या पिढी सोबतही स्नेहसबंध कायम ठेवले.

राहुरीचे माजी आमदार चंद्रशेखर कदम यांनी आज ‘सकाळ’शी बोलताना बाबासाहेबांच्या सहवासातील मखमली क्षणांच्या स्मृतींची कुपी अलगद उघडली. ते म्हणाले, ‘‘माझे वडील कै. अण्णा पाटील कदम व बाबासाहेब हे दोघे जिवश्‍च कंठश्‍च मित्र आणि पुण्यातील एस. पी. महाविद्यालयाचे विद्यार्थी. वडील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राहुरी तालुक्यात प्रचारक होते, तर बाबासाहेब कोपरगाव तालुक्यात तीन वर्षे प्रचारक होते. मैत्री एवढी घट्ट राहीली की पुढे बाबासाहेबांच्या पत्नीचे आणि त्यांचे बिनसले की गाऱ्हाणे वडिलांकडे येई. वडिलांच्या पश्चात बाबासाहेबांनी आमच्या कुटुंबियांसोबतचा स्नेह जपला, हे आमचे भाग्य. माझे बंधू जगदिश त्यांच्या शिवसृष्टीच्या उभारणीचे काम पाहतात. बाबासाहेब म्हणजे विलक्षण व्यक्तिमत्व. जाणता राजा महानाट्य म्हणजे महानिर्मिती. त्याद्वारे शिवबांचे नाव जगभर नेण्याचे अतुलनीय काम त्यांनी केले. वडील गेल्यानंतर त्यांनी पाठविलेले पत्र मी आजही जपून ठेवलेय. त्यांनी आम्हाला वडिलांची माया दिली. छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या रक्तातच होते.

कोपरगावचे नाट्यकर्मी श्रीकांत बागूल म्हणाले, नगर जिल्ह्यात पाच अण्णांनी संघ रुजविला. त्यात राहुरीचे अण्णा पाटील कदम, माझे वडील अण्णा बागूल, बेलापूरचे अण्णा जाधव, नेवाशाचे अण्णा गायकवाड, नगरचे अॅड. अण्णासाहेब खेर या पाच अण्णांसोबत बाबासाहेबांचे ऋणानुबंध कायम राहिले. संघप्रचारक असताना ते बऱ्याचदा आमच्या घरी मुक्कामाला असत. संघाचे काम, महाविद्यालयीन अभ्यास आणि दुर्ग भ्रमंती हा छंद त्यांना त्यावेळपासून होता.
त्यांच्या हजार आठवणी आम्हा बागूल कुटुंबियांकडे आहेत. सहा महिन्यांपूर्वी त्यांची आणि माझी भेट झाली होती.

Shivshahir Babasaheb Purandare had a close relation with Ahmednagar district
PHOTO : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंना मान्यवरांनी वाहिली श्रद्धांजली

मखमली आठवणी

पुण्यात सिंहगडाजवळ बाबासाहेबांच्या सायकलची चेन तुटली. ती चेन माझ्या वडिलांच्या सायकलला बांधली. त्यांच्यासह सायकल खेचत वडील थेट पुरंदरे वाड्यापर्यंत आले. श्रीरामपुरात जाणता राजा महानाट्यच्या आयोजनासाठी आम्हा कदम बंधूंनी पुढाकार घेतला. या निमित्ताने आम्हा सर्वांना त्यांचा प्रदीर्घकाळ सहवास लाभला. एका अर्थाने तो सुवर्णसहवास होता. आमचे वडील आमच्या सोबत आहेत, असा भास व्हायचा.
चंद्रशेखर कदम, माजी आमदार, राहुरी

१९४२ च्या सुमारास संघप्रचारक असताना ते वसंत काका कोऱ्हाळकरांच्या घरी एकदा मुक्कामी होते. नेमका त्याच रात्री त्यांच्या घरातील सोन्याचा दागिना हरवला. बाहेरचा माणूस म्हणून वहीम बाबासाहेबांवर होता. मात्र वसंत काकांच्या आई माई कोऱ्हाळकर यांनी त्यांच्यावर ठाम विश्वास व्यक्त केला. तो सार्थ ठरला दोन तीन दिवसांनी दागिना सापडला. हा प्रकार कळाल्यानंतर बाबासाहेब ओक्साबोक्सी रडले. हे पाहून कोऱ्हाळकर व बागूल कुटुंबातील सर्वांचेच डोळे भरून आले. बाबासाहेब म्हणजे शंभर नंबरी सोने, असे माझे वडील कायम म्हणायचे.
श्रीकांत बागूल, नाट्यकर्मी, कोपरगाव

Shivshahir Babasaheb Purandare had a close relation with Ahmednagar district
उदयनराजे भोसले यांनी बाबासाहेब पुरंदरे यांना श्रद्धांजली वाहिली; पाहा व्हिडिओ

बाबासाहेब कोपरगावात संघप्रचारक असतानाच्या आठवणी नेहमी सांगत. तिघींनी मला घडविले. त्यात साक्षात गोदावरी, दुसऱ्या माई कोऱ्हाळकर आणि तिसऱ्या लावणीसम्राज्ञी कौत्सल्याबाई कोपरगावकर. कौत्सलाबाई तमासगीर होत्या. त्यांना राष्ट्रपती पुरस्कार मिळाला. पु. ल. देशपांडे आणि बाबासाहेबांच्या आग्रहावरून पुढे त्यांनी महिला लेखिकांसाठी पुण्यात गाणे सादर केले. शील या शब्दाची व्याख्या सांगताना बाबासाहेब कौत्सलाबाईंचे उदाहरण हमखास देत.
-संजय काळे, माहिती अधिकारातील कार्यकर्ते,

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com