धक्कादायक ः माजी नगरसेवक दिगंबर ढवण उर्फ महाराज यांचे निधन

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 2 ऑगस्ट 2020

ते महाराज या टोपण नावाने परिचित होते. कट्टर शिवसैनिक म्हणून त्यांचा लौकिक होता. माजी आमदार अनिल राठोड यांची सावेडीतील धुरा त्यांच्याकडेच होती.

अहमदनगर ः सावेडीतील माजी नगरसेवक दिगंबर ढवण यांचे आज रात्री ह्रदयविकाराने निधन झाले. ते ४३ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाची माहिती वार्यासारखी सावेडी उपनगरात तसेच शहरात पसरली.

ते महाराज या टोपण नावाने परिचित होते. कट्टर शिवसैनिक म्हणून त्यांचा लौकिक होता. माजी आमदार अनिल राठोड यांची सावेडीतील धुरा त्यांच्याकडेच होती. मोबाईल नगरसेवक म्हणूनही ते ओळखले जायचे. तपोवन रस्ता परिसरातील ढवण वस्ती हा त्यांचा बालेकिल्ला होता. मागील निवडणुकीवेळी ते शिवसेनेपासून काहीसे दुरावले होते. त्यावेळी घेतलेला मेळावा अभूतपूर्व होता.

प्रभागातील कामे करून घेण्यासाठी ते जिवाचे रान करीत. महापालिकेत त्यांनी घोड्यावर जाऊन केलेले आंदोलन खूप गाजले. लोकांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी कधीच मागेपुढे पाहिले नाही. त्यांना मानणारा मोठा वर्ग या प्रभागात आहे. त्यांची पत्नी शारदाताई यांनीही प्रभागाची धुरा सांभाळली होती.

सायंकाळी ते फिरायला गेले होते. त्यावेळी त्यांना त्रास जाणवू लागला. त्यामुळे त्यांना खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या निधनामुळे नगरच्या राजकीय वर्तुळात धक्का बसला आहे. मनमिळावू स्वभावामुळे त्यांनी मोठा लोकसंग्रह केला होता.

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shocking: Former corporator Digambar Dhawan dies of heart attack