Shirdi : साईंच्या झोळीत अठरा कोटींचे दान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shirdi

Shirdi : साईंच्या झोळीत अठरा कोटींचे दान

शिर्डी : श्रद्धा व सबुरीचा संदेश देणाऱ्या व आंतरराष्ट्रीय ख्याती असलेल्या येथील श्री साईबाबा समाधी मंदिरात दीपावलीनिमित्त भाविकांनी अठरा कोटींचे दान साईचरणी अर्पण केले. दीपावलीच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी अडीच कोटीहून अधिक भाविक साईदरबारी हजेरी लावून नतमस्तक होतात. कोरोना संसर्गाच्या काळानंतर साई मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी केल्याचे दिसून आले. २० ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर या काळात सुट्यांच्या पार्श्वभूमीवर भाविकांनी रेकॉर्ड ब्रेक गर्दी करत समाधी मंदिराचे दर्शन घेतले.

या पंधरा दिवसाच्या काळात भाविकांनी १७ कोटी ७७ लाख ५३ हजारांचे दान साईबाबांना अर्पण केल्याची माहिती संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बाणाईत यांनी दिली़. साईबाबा मंदिरातील सर्व दानपेटी मिळून ३ कोटी ११ लाख ७९ हजार रुपये जमा झाले. तर देणगी काउंटरवर भक्तांनी ७ कोटी ५४ लाख ४५ हजार, १ कोटी ४५ लाख ४२ हजार रुपयांची ऑनलाइन देणगी, चेक, डीडीद्वारे जमा झालेली देणगी ३ कोटी ३ लाख ५५ हजार, मनिऑर्डरद्वारे ७ लाख २८ हजार, डेबिट क्रेडिट कार्डद्वारे देणगी १ कोटी ८४ लाख २२ हजार या काळात ८६०. ४५० ग्रॅम अंदाजे किंमत ३९ लाख ५३ हजार रुपयांचे सोने तर १३३४५. ९७० ग्रॅम, (किंमत ५ लाख ४५ हजार) चांदी व दागिने, २९ देशातील २४ लाख ८० हजार रुपयांचे परकीय चलन दक्षिणा पेटीत भाविकांनी अर्पण केल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.

अन्नदाने दृढायुष्यी । उदकदाने सदासुखी ।

मंदिरदाने भुवनपालखी । सुपरिमलु उपचार ॥

वस्त्रदाने सुंदरपण । तांबुलदाने मनुष्यपण ।

ज्ञानदाने ब्राह्मणपण । अतिलावण्य सुंदरता ।।

संत नामदेव महाराजांनी दान करण्याविषयी आपल्या अभंगातून असे सुंदर विवेचन केले आहे.