Srigonde : रणांगण सोडलेले नाही अन् सोडणारही नाही | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Babanrao Pacchpute

Shrigonda: रणांगण सोडलेले नाही अन् सोडणारही नाही

श्रीगोंदे : काही दिवसांपासून तब्येत साथ देत नाही हे खरे असले, तरी याही परिस्थितीत लोक आजही आपल्याच संपर्कात आहेत. आपण राजकारणातून रिटायर्ड झाल्याची आवई विरोधकांनी उठवली आहे; पण त्यांनी आमदारकीची फक्त स्वप्ने पाहावीत, मी अजून रणांगण सोडलेले नाही. आगामी विधानसभा लोकांच्या जिवावर लढणार आणि जिंकणारही, असा आत्मविश्वास आमदार बबनराव पाचपुते यांनी व्यक्त केला.

पाचपुते यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त ‘सकाळ’शी बोलताना ते म्हणाले, की तालुक्यातील लोकांसाठी आरोग्याची काळजी घेत होतो. त्यासाठी व्यायामाला महत्त्व दिले. मात्र, कोरोना काळात अडचणी वाढल्या. आता सर्व ठीक होत असून, लवकरच लोकांमध्ये जाणार आहे.

तब्येत साथ देत नाही, विरोधक वेगळीच चर्चा करतात, असे विचारताच पाचपुते म्हणाले, की मी रणांगण सोडलेले नाही. माझ्यासोबत मागील ४२ वर्षांचे सामान्यांच्या पाठबळाचे कवच आहे. काही जण, मी लढणार नाही व मग ते आमदार होणार, अशी स्वप्ने पाहत आहेत. त्यांचे तालुक्याच्या विकासात योगदान काय आहे? विकासात माझे प्रयत्न व संघर्ष आहे. १९८० मधील आणि आताचा तालुका यातील फरकच सगळे सांगून जातो. लोकांसाठी पुन्हा लढणार असून, विरोधकांनी त्यांची तयारी करावी, असे खुले आव्हानही त्यांनी दिले.

जिल्ह्याच्या विकासावर मत व्यक्त करताना ते म्हणाले, की पालकमंत्री असताना जिल्ह्याच्या विकासाचा आराखडा ‘व्हीजन २०२०’च्या माध्यमातून मांडला. मात्र, काहींना त्याची ॲलर्जी होती. पुढे हेच व्हीजन सुरू झाले. उसाचा पट्टा, दुधाचे सिमन्स यातून शेतकऱ्यांच्या घरात अतिरिक्त पैसा देण्याचे काम केले. तलावातील गाळ काढण्याचे आदेश दिल्यावर सरकारमधील सहकाऱ्यांनीच अविश्‍वास दाखवीत ‘परस्पर निर्णय घेणारे तुम्ही कोण,’ असा सवालही केला. मात्र, गाळ काढण्याच्या मोहिमेने जिल्ह्यात वीस हजार एकर क्षेत्र बागायती झाले.

काय करायचे राहिले, असे विचारता पाचपुते म्हणाले, की कृषी महाविद्यालय हा जिव्हाळ्याचा विषय आहे. अद्ययावत सरकारी रुग्णालय, शहराबाहेरून जाणारा रिंग रोड, अनेक वर्षे गाजणारी औद्योगिक वसाहत, हे प्रश्न सोडवायचे आहेत. ते पुढच्या टर्मला सोडविले जातील. सध्याचे राज्यातील सरकार कार्यकाळ पूर्ण तर करीलच, शिवाय पुढेही तेच सरकार येईल.

Web Title: Shrigonda Babanrao Pacchpute Vision Leader Assembly

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..