श्रीगोंद्यातून सीना प्रकल्पही निघणार, कर्जतसाठी कोळवडीला कार्यालय

संजय आ. काटे
Thursday, 24 September 2020

श्रीगोंदे व कर्जत तालुक्‍यांतील कुकडी कालव्याच्या सिंचनाच्या नियोजनासह अन्य आस्थापना विभागीय कार्यालयातून होत होत्या. मात्र, काही दिवसांपूर्वी कर्जत येथील सुमारे 14 हजार हेक्‍टरचे सिंचन कर्जत तालुक्‍यातील कोळवडी विभागातून पाहण्याचा आदेश जलसंपदा विभागाने दिला.

श्रीगोंदे : श्रीगोंदे व कर्जत तालुक्‍यांतील कुकडी, घोड, सीना प्रकल्पांचे विभागीय कार्यालय 16 वर्षांपूर्वी श्रीगोंदे येथे सुरू झाले. मात्र, आता कर्जतचे सिंचन त्यातून वगळून ते कोळवडी विभागाला जोडण्यात आले.

काही दिवसांत सीना प्रकल्पही या कार्यालयातून काढला जाणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे येथील विभागीय कार्यालय कुकडी कालव्याच्या सिंचनासाठी, श्रीगोंदे तालुक्‍यापुरतेही राहते की नाही, अशी भीती आहे. कारण, कुकडी कालवा सुरू होताना, तालुक्‍यातील सुरवातीचे 20 किलोमीटरचे सिंचन नारायणगाव विभागाला जोडले आहे. 

श्रीगोंदे व कर्जत तालुक्‍यांतील कुकडी कालव्याच्या सिंचनाच्या नियोजनासह अन्य आस्थापना विभागीय कार्यालयातून होत होत्या. मात्र, काही दिवसांपूर्वी कर्जत येथील सुमारे 14 हजार हेक्‍टरचे सिंचन कर्जत तालुक्‍यातील कोळवडी विभागातून पाहण्याचा आदेश जलसंपदा विभागाने दिला. परिणामी, विभागीय कार्यालयाचे कामकाज मर्यादित झाले.

या कार्यालयातून राशीन (ता. कर्जत) येथील सिंचन पाहिले जात होते. मात्र, श्रीगोंद्यातून न्याय मिळत नसल्याची तेथील शेतकऱ्यांची भावना होती. त्यामुळे जलसंपदा विभागाने राशीन उपविभागाची आस्थापना वगळता, इतर सगळी कामे कोळवडी विभागाला जोडली. कोळवडी विभाग बांधकामापुरता मर्यादित होता. आता तेथून सिंचनाचे कामही पाहिले जाणार आहे. 

दरम्यान, सीना प्रकल्पाचे कामही येथील विभागीय कार्यालयातून काढून कोळवडी विभागाला जोडले जाणार असल्याची माहिती आहे. तसे झाल्यास कर्जतचा पूर्ण कारभार या कार्यालयातून वगळला जाणार आहे. या परिस्थितीत "कुकडी'च्या डाव्या कालव्यावरील श्रीगोंदे तालुक्‍यातील 110 ते 165 या 45 किलोमीटरमधीलच सिंचन व्यवस्था या कार्यालयाअंतर्गत राहील.

मुळात श्रीगोंद्यात "कुकडी'ची हद्द 90व्या किलोमीटरपासून सुरू होते; तथापि पहिल्या 20 किलोमीटरचा भाग नारायणगाव विभागाला जोडला आहे. परिणामी, काही दिवसांत येथील विभागीय कार्यालय तालुक्‍यापुरतेही राहत नसल्याचे वास्तव आहे.

अशा वेळी नारायणगावला जोडलेल्या 20 किलोमीटरमधील गावे व क्षेत्र या कार्यालयाला जोडण्यासाठी कोणीही प्रयत्न करीत नसल्याचे दिसते. 

महावितरणचे श्रीगोंद्यातील काम कर्जतहून 
कर्जतमधील "कुकडी'च्या शेतकऱ्यांना न्याय मिळत नसल्याने, तेथील सिंचन श्रीगोंद्याच्या विभागीय कार्यालयातून काढले. मात्र, त्याच वेळी श्रीगोंदे व बेलवंडी हे महावितरणचे सर्वाधिक ग्राहक असणारे उपविभाग कर्जतलाच जोडलेले आहेत. त्यामुळे विजेच्या कामांसाठी येथील शेतकऱ्यांना कर्जतला हेलपाटे मारावे लागतात. महावितरणचा कारभार श्रीगोंद्यातून सुरू ठेवण्यासाठी येथील नेते कुठलाही प्रयत्न करीत नसल्याचे वास्तव आहे. 

 

राज्य सरकारने अध्यादेश काढून कुकडी डाव्या कालव्यावरील राशीन उपविभागाचे सिंचन क्षेत्र कोळवडी विभागाला जोडले. तेथील आस्थापनाचे कामकाज श्रीगोंदे येथील विभागातून चालणार असले, तरी पाणीवितरण मात्र कोळवडी विभाग पाहणार आहे. 
- स्वप्नील काळे, कार्यकारी अभियंता, श्रीगोंदे , अहमदनगर

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shrigonda divisional office was divided