मोकाट जनावराला वाचवताना रिक्षा चालकाचा मृत्यू

गौरव साळुंके
Friday, 27 November 2020

नेवासा रस्त्यावर बाजार समितीसमोर प्रवाशी रिक्षा आणि दुचाकीचा आज अपघात घडला.

श्रीरामपूर (अहमदनगर) : येथील नेवासा रस्त्यावर बाजार समितीसमोर प्रवाशी रिक्षा आणि दुचाकीचा आज अपघात घडला. यात रिक्षा चालकाचा मृत्यू झाला. तर प्रवाशी वृद्ध महिला जखमी असून उपचार सुरु आहेत. हरेगाव येथून रिक्षा प्रवांशी घेवून शहरात येत असताना समोरुन आलेल्या दुचाकीची रिक्षाला धडक बसली. रस्त्यावर आलेल्या मोकाट जणावरांना चुकविण्यासाठी दुचाकीस्वार आणि रिक्षा समोरासमोर आल्याने अपघात घडल्याचे अपघातस्थळी जमलेल्या नागरीकांनी सांगितले. 

अपघातात जखमी रिक्षा चालक आतिश भास्कर शिंदे (वय. ३८, रा. हरेगाव) आणि प्रवाशी महिला गयाबाई चंद्रभान खाजेकर (वय. ७०, रा. हरेगाव) यांना उपचारासाठी नागरीकांनी तातडीने कामगार रुग्णालयात हलविले. परंतू शिंदे गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकार्यांनी सांगितले. अपघात घडल्यानंतर दुचाकीस्वार दुचाकी घेवून सुसाट वेगात पसार झाला. असून जखमी खाजेकर यांच्यावर कामगार रुग्णालयात उपचार सुरु आहे. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. सीसीटिव्ही कॅमेराच्या आधारे अपघातातील पसार दुचाकीस्वाराचा शोध सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

दरम्यान, शहरातील मोकाट कुत्रे आणि मोकाट जणावरांची संख्या वाढली आहेत. मोकाट जणावरे रस्त्यावर भंटकत असल्याने अनेक अपघाताच्या घटना घडल्या आहे. परिणामी, शहरातील मोकाट जणावरांसह कुत्र्यांचा प्रश्न गंभीर बनला आहे. शहर परिसरातील अनेक रस्त्यासह विविध चौकात मोकाट जणावरे उभी असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. परिणामी, लहान-मोठ्या अपघातांना निमंत्रण मिळत असल्याचे नागरीक सांगतात.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shrirampur news Motorcycle Riksha accident driver killed