श्रीरामपूरमध्ये स्मार्ट पोलिसिंग, गुन्हे तपासासाठी सीसीटीव्हीची मदत; ऐंशी टक्के गुन्ह्यांची उकल 

गौरव साळुंके
Monday, 4 January 2021

पोलिस प्रशासनाला शहर परिसरातील गुन्हेगारी आटोक्‍यात ठेवण्यात काहीअंशी यश मिळाले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा विविध गुन्हेगारीचे प्रमाण कमी झाले आहे. त्यासाठी कोरोनाचा लॉकडाउनही कारणीभूत ठरला. 

श्रीरामपूर ः पोलिस प्रशासनाला शहर परिसरातील गुन्हेगारी आटोक्‍यात ठेवण्यात काहीअंशी यश मिळाले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा विविध गुन्हेगारीचे प्रमाण कमी झाले आहे. त्यासाठी कोरोनाचा लॉकडाउनही कारणीभूत ठरला. तर, शहरात सीसीटीव्ही बसविल्याने विविध गुन्ह्यांचे प्रमाण वर्षाअखेर घटले आहे. शहर पोलिस ठाण्यात गत वर्षात दाखल गुन्ह्यापैकी 80 टक्के गुन्ह्यांची पोलिसांनी उकल केली. 
गुन्हेगारी कमी करण्यासाठी शहर पोलिसांना सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा विशेष फायदा झाला. पोलिसांनी वर्षभरापूर्वी शहरातील प्रमुख चौकासह विविध परिसरात 30 ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविले. त्यामुळे सोनसाखळी चोरी, महिलांच्या पर्स, दुचाकी व मोबाईल चोरीचे प्रकार रोखण्यात पोलिसांना यश आले. तसेच चोरीसह अनेक गुन्ह्यांचा तपास करताना पोलिसांना सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा आधार मिळाला. 

304 पैकी 243 गुन्हे उघड 

श्रीरामपूर शहर परिसरातील गुन्ह्यांची आकडेवारी पुढीलप्रमाणे : खून- दोन, खुनाचा प्रयत्न - चार, दरोडा - तीन, जबरी चोरी - 13, घरफोडी -26, दुचाकी चोरी - 48, विनयभंग -20, बलात्कार - नऊ, मंगळसूत्र चोरी - चार, मोबाईल चोरी - सहा, गर्दी मारामारी - सात, इतर - 43 गुन्ह्यांसह असे एकूण गुन्हे -304 गुन्हे दाखल झाले. त्यापैकी 243 गुन्हे पोलिस प्रशासनाने उघड केल्याने 80 टक्के गुन्ह्यांची पोलिसांनी उकल केल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

चोरांवर सीसीटीव्हीची नजर 
गेल्या वर्षी शहर परिसरात सोनसाखळी चोरी, चोरी, जबरी चोरी, वाहन चोरी, मोबाईल चोरी असे एकूण 100हून अधिक गुन्हे दाखल झाले होते. परंतु, शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविल्याने गुन्ह्यांची संख्या घटली. गुन्ह्याच्या तपासासाठीही सीसीटीव्हीची मदत होत आहे. - आयुष नोपाणी, सहायक पोलिस अधीक्षक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shrirampur police started smart policing in the city