युवानेत्यासह २३ जणांना कोरोनाची बाधा रॅपीड तपासणीत आढळले पाच रुग्ण

गौरव साळुंके
Saturday, 25 July 2020

शहरात दिवसेंदिवस कोरोनाचा संसर्ग वाढत असुन आज दिवसभरात २३ नव्या रुग्णांची नोंद झाली.

श्रीरामपूर (अहमदनगर) : शहरात दिवसेंदिवस कोरोनाचा संसर्ग वाढत असुन आज दिवसभरात २३ नव्या रुग्णांची नोंद झाली. त्यात एका युवानेत्यासह पत्नी, दोन मुले, राऊत वस्ती तीन, पढेगाव एक, प्रभाग सात एकासह बेलापूर व फत्याबाद येथील प्रत्येकी एक तर सायंकाळी उशिरा प्राप्त झालेल्या अहवालात विविध ठिकाणचे ११ अशा २३ रुग्णांचा त्यात समावेश आहे. 

शहरातील कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने संसर्गाची साखळी तोडण्यात प्रशासनाला अपयश आले आहे. काल तीघांना कोरोनाची बाधा झाल्यानंतर आज नव्याने २३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. त्यामुळे शहरासह तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या १६४ झाली असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.

आरोग्य विभागाने आज १६ नागरीकांची तपासणी केली. दरम्यान, युवानेत्याला सर्दी, तापाची लक्षणे आढळल्याने त्यांची रॅपीड तपासणी केल्यानंतर ते कोरोना पाॅझिटिव्ह आले. त्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले. रॅपीड तपासणीत आज पाच तर अन्य १८ कोरोनाबाधित आढळले. कोरोनामुळे दोन संशयीतांसह सात जणांचा मृत्यु झाला.

तर ६० हुन अधिक रुग्ण उपचारानंतर बरे होऊन घरी परतले. संतलुक रुग्णालयातील कोविड उपचार विभागात अॅक्टीव रुग्णांवर उपचार सुरु असुन गंभीर रुग्णांना नगरला हलविले जाते. तर इतर रुग्णांवर येथेच उपचार केले जातात. तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात सुविधा असुन डाॅ. आबेंडकर वस्तीगृहात संशयीतांना संस्थात्मक क्वाॅरंटाईन केले जाते. कोरोनाचा संसर्ग ग्रामीण भागातील काही गावासह शहरातील अनेक प्रभागात पसरल्याने सर्वांचीच धास्ती वाढली आहे.

दरम्यान, बेलापुरातील एका कोरोनाबाधिताच्या संपर्कातील १४ नागरीकांना तपासणीसाठी शहरात आणले. परंतू त्यांना रात्रभर रुग्णालयात ठेऊन स्त्राव न घेता घरी सोडण्यात आले. खबरदारी म्हणुन त्यांना क्वाॅरंटाईन करणे गरजेचे असताना ते सर्वत्र फिरले. अशा प्रकारामुळे कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचा आरोप बेलापूर ग्रामस्थांनी केला आहे. या प्रकाराबाबत स्थानिक कोरोना सुरक्षा समितीने बैठक घेतली आहे.

प्राथमिक आरोग्य विभागाने सदर १४ नागरीकांना तपासणीसाठी कोरोना केअर सेंटरला पाठवले. परंतू तपासणीसाठी त्यांच्या घशातील स्त्राव न घेतल्यामुळे ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला. पुढील काळात कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यानंतर त्यांच्या संपर्कातील व्यक्तींचा तातडीने शोध घेवुन त्यांना क्वाॅरंटाईन करावे. तपासणीसाठी त्यांच्या घशातील स्त्राव घ्यावे. अहवाल प्राप्त होईपर्यंत संशयीताना होम क्वाॅरंटाईन करावे. त्यामुळे वाढता संसर्ग रोखण्यात प्रशासनाला यश येईल, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Shrirampur taluka 23 people were diagnosed with coronary artery disease and five patients were found