
शहरातील प्रमुख रस्त्यांच्या दोन्ही बाजुला अनेक लहान-मोठे स्टॉल थाटल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे.
श्रीरामपूर (अहमदनगर) : शहर परिसतील अनेक भागात सध्या अतिक्रमणाचा वेढा वाढला आहे. शहरातील प्रमुख रस्त्यांच्या दोन्ही बाजुला अनेक लहान-मोठे स्टॉल थाटल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे.
लॉकडाउनंतर दसरा आणि दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेला नवी उभारी मिळाली. एकीकडे लॉकडाउननंतर बाजारपेठेतील विस्कटलेली आर्थिक घडी सुरळीत होत असताना दुसरीकडे मात्र, शहरातील अतिक्रमणे मोठ्या प्रमाणात वाढली आहेत.
अनेक व्यावसायीक ग्राहक आकर्षित करण्यासाठी दुकानांसमोरील मोकळ्या जागेत विक्रीसाठी विविध साहित्य लावतात. त्यामुळे खरेदीसाठी आलेला ग्राहक रस्त्यावरच वाहने उभी करुन खरेदी करतो. परिणामी, दुकानासमोरील वाहन पार्किंगमुळे शहरातील वाहतुक व्यवस्था विस्कळीत झाल्याचे दिसते. अनेक कार्यालयासमोर वाहने उभी करण्यासाठी पुरेशी जागा नसल्याने रस्त्यावरच शेकडो वाहने उभी करतात. शहरातील अतिक्रमणे दिवसेंदिवस वाढत असून त्यावर नियंत्रणासाठी पालिकेच्या दंडात्मक कारवाईची गरज निर्माण झाली आहे.
नेवासे रस्ता, संगमनेर रस्ता, बेलापूर रस्ता, गोंधवणी रस्ता, शिवाजी रस्ता अशा प्रमुख रस्त्यांसह मुख्य रस्ता परिसरातील अतिक्रमण काढणे पालिकेसमोर मोठे आव्हान ठरत आहे. शहरातील अतिक्रमणे वाढत असताना पालिकेकडुन अद्याप कुठलीही कारवाई झाली नाही. रस्त्यावर मांडलेला बाजार आणखी वेगात वाढत आहे.
सध्या शहरात अनेक भागात बांधकामे सुरु आहेत. विविध ठिकाणी बांधकामाचे साहित्य रस्त्यावर टाकल्याचे दिसते. रस्त्याच्या कडेला टाकलेल्या साहित्यामुळे वाहतुक कोंडी होते. रस्ता दुभाजकांना कचरा कुंड्याचे स्वरुप आले असून प्रवाशांना दुर्गधींचा सामना करावा लागतो. त्यामुळे पालिकेने शहर परिसरात विस्तारलेल्या अतिक्रमणांवर कारवाईसह रस्ता दुभाजकामध्ये कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईची मागणी केली.
संपादन : अशोक मुरुमकर