esakal | नगर जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यात पुन्हा लॉकडाऊन लागण्याची चिन्हे
sakal

बोलून बातमी शोधा

Signs of re lockdown in Rahuri taluka of Nagar district

दोन दिवसांपासून तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या पन्नाशी ओलांडीत आहे.

नगर जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यात पुन्हा लॉकडाऊन लागण्याची चिन्हे

sakal_logo
By
विलास कुलकर्णी

राहुरी (अहमदनगर) : दोन दिवसांपासून तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या पन्नाशी ओलांडीत आहे. शनिवारी (ता. ५) राहुरी शहरात उच्चांकी म्हणजे ३७ जण पॉझिटिव्ह आढळले. शहरात समूह संक्रमणाच्या दिशेने शहराची वाटचाल सुरु झाली आहे. जनता सुसाट. तर, प्रशासनाला मरगळ आली आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शहरात १० दिवस लॉकडाऊन करुन, जनता कर्फ्यू करावा, अशी मागणी सुज्ञ नागरिक करू लागले आहेत.

कोरोनाचे अनलॉक सुरु झाले. राहुरी शहराची बाजारपेठ खुली झाली. लॉकडाऊन काळात प्रशासनाने घेतलेल्या मेहनतीवर पाणी फिरू लागले. जनतेची गर्दी नियंत्रणाबाहेर जाऊ लागली. मास्क लावण्याचे प्रमाण घटले. त्यामुळे, कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढू लागली. मागील आठ दिवसात बाधितांच्या वेग वाढला. दोन दिवसांपासून दररोज ५० पेक्षा जास्त बाधित आढळण्यास सुरुवात झाली. पोलिस व महसूल प्रशासन हतबल झाले आहे. 

कोरोनाचा संसर्ग घरोघरी पोहोचला आहे. एकाच कुटुंबातील दहा- बारा जण पॉझिटिव्ह आढळत आहेत.  खासगी दवाखान्यातील डॉक्टर, कर्मचारी वर्ग, बाजारपेठेतील व्यापारी, हॉटेल मालक व कामगार पॉझिटिव्ह आढळत आहेत. दवाखान्यात उपचार घेणारे कोरोनाबाधित त्यांच्या नातेवाईकांना गांभीर्य पटवून देत आहेत. त्यामुळे, सुज्ञ नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. 

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राहुरी शहरात १० दिवस लॉकडाऊन करुन, जनता कर्फ्यू लागू करावा. अशी मागणी जोर धरू लागली आहे. छोट्या व्यावसायिकांचा मात्र त्याला विरोध होतांना दिसत आहे. त्यामुळे प्रशासनापुढे पेच प्रसंग निर्माण झाला आहे. 


राहुरी शहरात कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे.  शहरात भीती पसरली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राहुरी शहरात आठवडाभराचा लॉकडाऊन करण्याची गरज आहे. त्यासाठी व्यापाऱ्यांशी चर्चा करून, येत्या गुरुवार (ता. १०) ते पुढील गुरुवार (ता. १७) दरम्यान लॉकडाऊन करण्यास हरकत नाही, असे राहुरी व्यापरी असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश पारख यांनी सांगितले.

देवळाली प्रवरा येथील दत्ता कडू म्हणाले, देवळाली प्रवरा शहरात पालिकेतर्फे शंभर खाटांचे कोविड केअर सेंटर उभारणे गरजेचे आहे. पालिकेचे मुख्याधिकारी यांच्याकडे तशी मागणी केली आहे. कोरोनाची लस येईपर्यंत प्रत्येक गावात विलगीकरण कक्षाची गरज आहे.  

कोरोना संक्रमणाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता खबरदारी म्हणून राहुरी शहरात व्यापारी प्रतिनिधी, नगरसेवक व सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी यांना विश्वासात घेऊन किमान आठवडाभराचा लॉकडाऊन करण्याचा विचार आहे. 
- प्राजक्त तनपुरे, नगरविकास राज्यमंत्री 

शनिवापर्यंतची तालुक्याची स्थिती 
कोरोना बाधितांची संख्या : ६३१
उपचार घेऊन घरी परतलेले : ३९७
उपचार घेणारे कोरोनाबाधित : २१२
कोरोनामुळे मृत्यू : २२ 

संपादन : अशोक मुरुमकर