esakal | शिवसेनेच्या वाघाने मागे घेतलेले पाऊल म्हणजे लांब उडीचे संकेतच
sakal

बोलून बातमी शोधा

Signs of Shivsena becoming mayor in Municipal Corporation

अहमदनगर महापालिकेच्या स्थायी समिती सभापती निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराने महाविकास आघाडी धर्म पाळत माघार घेतली. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मनोज कोतकर सभापती झाले. मात्र, हे संकेत शिवसेनेचा महापौर होण्याचे आहेत.

शिवसेनेच्या वाघाने मागे घेतलेले पाऊल म्हणजे लांब उडीचे संकेतच

sakal_logo
By
अमित आवारी

नगर : अहमदनगर महापालिकेच्या स्थायी समिती सभापती निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराने महाविकास आघाडी धर्म पाळत माघार घेतली. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मनोज कोतकर सभापती झाले. मात्र, हे संकेत शिवसेनेचा महापौर होण्याचे आहेत.

जून २०२१ मध्ये महापौरपदाची निवडणूक आहे. महापौरपद अनुसूचित जाती महिलेसाठी राखीव आहे. या पदासाठी शिवसेनेकडे भक्‍कम उमेदवार आहेत. तर सत्ताधारी भाजपकडे उमेदवार नाहीत. (त्यांचे संख्याबळही कमी आहे.) आता ज्या पद्धतीने शिवसेनेनी ज्या राष्ट्रवादीच्या उमेदवारासाठी माघारी घेतली तशी राष्ट्रवादीने शिवसेनेच्या महापौरपदाच्या निवडणूकीसाठी माघार घेतल्यास शिवसेनेकडे महामापौर पद जाऊ शकते.  कदाचित असंच ठरवून शिवसनेनी माघार घेतली असल्याची चर्चा आहे.

२०१८ मध्ये झालेल्या महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी नगर शहरात तीन मोठ्या घटना घडल्या होत्या. या घटनांमुळे भाजप व शिवसेना तसेच शिवसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्यात वितुष्ट निर्माण झाले होते. त्यामुळे भाजप व शिवसेनेची युती निवडणुकीत झाली नाही. केडगावमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेसचे उमेदवार नेहमी प्रमाणे सहज निवडून येतील, अशी स्थिती यंदा नव्हती. त्यामुळे आमदार संग्राम जगताप यांनी सोईचे राजकारण करत राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेसचे केडगावमधील आठही उमेदवार रातोरात निवडणुकीच्या ऐन धुमाळीत भाजपच्या गोटात नेले. यातील चार उमेदवार नगरसेवक झाले. यात आमदार संग्राम जगताप यांचा विश्‍वासू शिलेदार मनोज कोतकर यांचा समावेश होता. मनोज कोतकर हे पहिल्यापासून आमदार संग्राम जगताप व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते होते. मात्र सोयीचे राजकारण म्हणून ते भाजपमध्ये गेले होते. 

महापालिकेतील स्थायी समितीचे सभापतीपद बसपला एक वर्षांसाठी देण्यात आले होते. मात्र कायदेशीर तांत्रिक अडचणी व कोरोना लॉकडाउनमुळे स्थायी समिती सभापती पदाची निवडणूक पुढे ढकलत गेली. अशा स्थितीत भाजपने स्थायी समितीचा सभापती आमचा व्हावा, अशी इच्छा व्यक्‍त केली. त्यावेळी आमदार संग्राम जगताप यांना आपला विश्‍वासू मनोज कोतकर याला हे पद मिळावे असे वाटले. मात्र तोपर्यंत राज्यातील समिकरणे बदलली होती.

शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस व मित्रपक्षांची महाविकास आघाडी राज्यात सत्तेत आली होती. महाविकास आघाडीतील सर्व नेत्यांनी आघाडीचा धर्म स्थानिक पातळीवरही ठेवण्याचा शब्द दिला. त्यामुळे भाजपचे मनोज कोतकर यांना स्थायी समिती सभापतीपद मिळू शकणे अवघड झाले. अशा स्थिती आमदार संग्राम जगताप यांनी मनोज कोतकर यांना पुन्हा स्वगृही परतण्यास सांगितले. 

मनोज कोतकर यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाच्या खेळीमुळे शिवसेनेला राष्ट्रवादी कॉंग्रेसला पाठिंबा देणे भाग पडले. मात्र शिवसेनेने माघार घेताना जूनमध्ये होत असलेली महापौरपदाची निवडणूक डोळ्या समोर ठेवली. महापौरपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसलाही आघाडीचा धर्म पाळावा लागणार आहे. 

महापौरपद अनुसूचीत जाती महिला उमेदवारासाठी राखीव आहे. शिवसेनेकडे तीन अनुसूचीत जातीच्या नगरसेविका आहेत. यात रिता भाकरे, रोहिणी शेंडगे व शांताबाई शिंदे यांचा समावेश आहे. कॉंग्रेसकडे शीला चव्हाण तर राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे रुपाली पारगे या नगरसेविका आहेत. रोहिणी शेंडगे या माजी नगरसेवक संजय शेंडगे यांच्या पत्नी आहेत. संजय शेंडगे यांचे शहर शिवसेनेत चांगले वजन आहे. त्यामुळे रोहिणी शेंडगे यापदाच्या प्रबळ दावेदार आहेत. संख्याबळात महापालिकेत शिवसेना सर्वात मोठा पक्ष आहे त्या खालोखाल राष्ट्रवादी कॉंग्रेस आहे. त्यामुळे शिवसेनेसाठी स्थायी समिती सभापतीपदाची झालेली निवडणूक ही आगामी महापौरपदाची नांदी ठरण्याची शक्‍यता आहे.

अनुसूचीत जाती नगरसेविका
शिवसेना - रिता भाकरे, रोहिणी शेंडगे, शांताबाई शिंदे
राष्ट्रवादी कॉंग्रेस - रुपाली पारगे
कॉंग्रेस - शीला चव्हाण

महापालिकेतील संख्याबळ
शिवसेना - 23
राष्ट्रवादी कॉंग्रेस - 19
भाजप - 14
कॉंग्रेस - 5
बसप - 4
सप - 1
अपक्ष - 2
एकूण – 68

संपादन : अशोक मुरुमकर

loading image