esakal | कोरोनाच्या सिरियस पेशंटला मिळणार मोफत उपचार, या महापालिकेने उचलले हे पाऊल
sakal

बोलून बातमी शोधा

Sirius patients of Corona will get free treatment, this step was taken by Ahadnagar Municipal Corporation

आतापर्यंत महापालिकेने कोरोनावर केलेल्या खर्चाचा हिशेब मागितला. यावर लेखाधिकारी प्रवीण मानकर यांनी 60 लाख रुपये खर्च झाल्याचे सांगितले

कोरोनाच्या सिरियस पेशंटला मिळणार मोफत उपचार, या महापालिकेने उचलले हे पाऊल

sakal_logo
By
अमित आवारी

नगर ः शहरात कोरोनाबाधित रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत असताना महापालिका प्रशासनाकडून कोणतीही काळजी घेतली जात नसल्याबाबत स्थायी समितीच्या ऑनलाइन सभेत नगरसेवकांनी नाराजी व्यक्‍त केली. त्यामुळे शहरातील अत्यवस्थ कोविड रुग्णांसाठी महापालिकेने स्वतः व्हेंटिलेटर असलेले मोफत रुग्णालय सुरू करावे, असा ठराव या सभेत करण्यात आला. त्यानुसार प्रोफेसर कॉलनी चौकात हे कोविड सेंटर उभे राहील, असे सभापती मुदस्सर शेख यांनी सांगितले.

या सभेत सभापती मुदस्सर शेख, नगरसेवक गणेश भोसले, कुमार वाकळे, प्रकाश भागानगरे, परवीन कुरेशी, विजय पठारे, श्‍याम नळकांडे, सुप्रिया जाधव, सोनाली चितळे, योगीराज गाडे, मनोज कोतकर, डॉ. सागर बोरुडे, उपायुक्‍त प्रदीप पठारे, शहर अभियंता सुरेश इथापे आदी उपस्थित होते. 

हेही वाचा - पवार-विखे वादावर बोलले रोहित पवार

सभेच्या सुरवातीला शिवसेना उपनेते अनिल राठोड यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कोरोना संदर्भातील खर्चाचा विषय निघताच गणेश भोसले यांनी, आतापर्यंत महापालिकेने कोरोनावर केलेल्या खर्चाचा हिशेब मागितला. यावर लेखाधिकारी प्रवीण मानकर यांनी 60 लाख रुपये खर्च झाल्याचे सांगितले. यात 50 लाख 14व्या वित्त आयोगातील निधीतून, तर उर्वरित रक्‍कम जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आपत्ती निधीतून खर्च झाल्याचे ते म्हणाले.

प्रकाश भागानगरे यांनी महापालिकेतील कोविड सेंटरमध्ये असलेल्या डॉक्‍टरांना तीन महिन्यांपासून पगार मिळाला नसल्याचे सांगत नाराजी व्यक्‍त केली. 

डॉ. सागर बोरुडे यांनी, शहरात महापालिकेकडून कोणत्याही उपाययोजना योग्य प्रकारे राबविल्या जात नसल्याने पुणे-मुंबईसारखी स्थिती निर्माण होण्याचा धोका व्यक्त केला. तसेच, जिल्हा रुग्णालयात शहरातील नागरिकांसाठी स्वतंत्र कोटा राखीव ठेवण्याची मागणी केली.

भागानगरे यांनी, महापालिका कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांसाठी स्वतंत्र कोविड सेंटर सुरू करण्याची मागणी केली. श्याम नळकांडे यांनीही महापालिका कर्मचाऱ्यांसाठी शहरातील कोविड सेंटरमध्ये जागा राखीव ठेवण्याची मागणी केली. मनोज कोतकर यांनी, केडगावमध्ये मोठ्या प्रमाणात कोविड रुग्ण आढळून येत असताना महापालिकेकडून कोणत्याही उपाययोजना राबविल्या जात नसल्याबाबत नाराजी व्यक्‍त केली.

या बैठकीला महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी अनिल बोरगे उपस्थित नसल्याने कोरोनाविषयी वैद्यकीय उपाययोजनांबाबत महापालिकेच्या कोणत्याही अधिकाऱ्याने माहिती दिली नाही.

शहरातील अत्यवस्थ असलेल्या कोरोना रुग्णांना खासगी रुग्णालयांत उपचार घेणे परवडत नाही. त्यामुळे महापालिकेनेच कोविड सेंटर सुरू करून त्यात मोफत ऑक्‍सिजन व व्हेंटिलेटर पुरविण्याची मागणी गणेश भोसले यांनी केली. नळकांडे, भागानगरे आदी नगरसेवकांनीही या मागणीला दुजोरा दिला. सभापती मुदस्सर शेख यांनी प्रोफेसर कॉलनीतील महापालिकेच्या जागेत मोफत उपचारांसाठीचे कोविड सेंटर उभे करण्याचा ठराव मंजूर केला. 

शिवाजी महाराज व डॉ. आंबेडकर पुतळ्यांचे प्रस्ताव 
छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांचा विषय डॉ. सागर बोरुडे यांनी उपस्थित केला.

यावर शहर अभियंता सुरेश इथापे म्हणाले, ""शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासाठी महापालिका इमारतीतील जागा पोलिस प्रशासनाला दाखविली. त्यांनी जागा निश्‍चित केली; मात्र पुढील मान्यतेसाठी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे प्रस्ताव पाठविण्यास सांगितले आहे. त्याप्रमाणे प्रस्ताव लवकरच जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात येईल.

शहरातील उड्डाणपुलामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बाधित होण्याची शक्‍यता लक्षात घेता, आमदार संग्राम जगताप यांनी शासनाकडे या पुतळ्यासाठी नवीन जागा मागितली आहे.'' 

संपादन - अशोक निंबाळकर

loading image