जिल्ह्यातील 45 कोरोनाबाधित रुग्णांपैकी रुग्णालयात सध्या आठ जण उपचार घेत आहेत. तीन रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला. जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठविलेल्या 18 व्यक्तींच्या घशातील स्राव नमुन्यांपैकी 16 व्यक्तींचे अहवाल आज प्राप्त झाले. हे सर्व अहवाल निगेटिव्ह आहेत.
नगर : जिल्ह्याची वाटचाल आता "ऑरेंज झोन'कडून "ग्रीन झोन'कडे सुरू झाली आहे. जामखेड येथील दोन व संगमनेर येथील चार कोरोनाबाधित रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना आज डिस्चार्ज देण्यात आला. या सहा रुग्णांना आरोग्य कर्मचाऱ्यांनी स्वागत करून निरोप दिला. जिल्ह्यातील 45 कोरोनाबाधितांपैकी 34 रुग्ण आजपर्यंत कोरोनामुक्त झाल्याने, ही जिल्हावासीयांसाठी "गुड न्यूज' ठरली आहे.
जिल्ह्यातील 45 कोरोनाबाधित रुग्णांपैकी रुग्णालयात सध्या आठ जण उपचार घेत आहेत. तीन रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला. जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठविलेल्या 18 व्यक्तींच्या घशातील स्राव नमुन्यांपैकी 16 व्यक्तींचे अहवाल आज प्राप्त झाले. हे सर्व अहवाल निगेटिव्ह आहेत.
जामखेडमध्ये दोघे संस्थात्मक देखरेखीखाली
संगमनेर येथे चार नेपाळी व्यक्ती 14 दिवसांकरिता क्वारंटाईन करण्यात आल्या होत्या. त्यांचे 14 दिवसांनंतरचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यामुळे त्यांना बूथ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांचे नंतरचे दोन्ही अहवाल आणि जामखेड येथील कोरोनाबाधित मृत व्यक्तीच्या मुलांच्या संपर्कात आलेल्या दोघांचे अहवालही निगेटिव्ह आल्याने या सर्वांना डिस्चार्ज देण्यात आला. मात्र, जामखेड हॉट स्पॉट क्षेत्र असल्याने तेथील दोघांना संस्थात्मक देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे.
यंत्रणेचे कौतुक
नगरच्या बूथ हॉस्पिटलमध्ये रुग्ण बरे होण्याचे प्रमाण पाहून पालकमंत्री हसन मुश्रीफ, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख व नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी हॉस्पिटलच्या सर्व डॉक्टरांचे, आरोग्य यंत्रणेचे कौतुक केले आहे. लॉकडाउन काळात दाखविलेल्या संयमाबद्दल जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनीही नागरिकांचे आभार मानले. आगामी काळातही सर्वांनी काळजी घेण्याचे आवाहन या सर्वांनी केले आहे.