नागोबानं गिळलं बेडूकदादाला, जीवावर बेतल्यावर केली उलटी

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 5 November 2020

नागोबा शिकार आत ढकलत होता, तर बेडूक आपली सुटका करण्यासाठी आटापिटा करीत होता. शेवटी नागाने त्याला गिळूनच टाकलं.

अकोले : नागोबा हे नाव उच्चारलं तरी माणसाला धडकी भरते. इतर पशु-पक्षीही त्यापासून थरकून असतात. बेडकदादा तर त्याला जाम घाबरून असतात. अकोले तालुक्यात मात्र घडलं उलटंच. बेडूकदादाने नागोबाला चांगलाच घाम फोडला. अगदी त्याची जीव जायची वेळ आली होती.

एका नागोबाला शिकारीची हौस झाली. त्याने दबा धरून बेडकाला गट्टम केलं. बेडकानेही मग आपल्या जीवावरच बेतलं म्हणल्यावर फुगायला सुरूवात केली.

नागोबा शिकार आत ढकलत होता, तर बेडूक आपली सुटका करण्यासाठी आटापिटा करीत होता. शेवटी नागाने त्याला गिळूनच टाकलं आणि बेडकानेही होता होईल एवढा आपला आकार वाढवला. त्यामुळे नागोबाच्या जीवाची तलखी व्हायला लागली. श्वास नलिकांवर दाब आल्याने बेडकाचीच जीव जाण्याची वेळ आली. धड त्याला गिळताही येईना आणि बेडूक बाहेरही काढता येईना. या दोघांतील युद्धात बेडकाचा जीव गेला. परंतु नागराजांवरही तीच वेळ गुदरली होती.

या हातघाईच्या लढाईची माहिती कोणीतरी सर्पमित्र धनू मोहिते यांच्या कानावर घातली. ते लगबगीने तेथे गेले. अर्धा तास झुंज सुरू होती. शेवटी त्यांनी थोडीफार मदत केल्यानंतर त्यांनी सापाच्या तोंडून बेडूक बाहेर काढले.  

सर्पराजानेही सुटकेचा निश्वास टाकला. शेवटी मोहित यांनी जीव वाचलेल्या नागोबांना जंगलात सोडून दिले. ही घटना अकोले शहरात श्री स्वामी समर्थ मंदिर परिसर पाटील गल्लीत घडली. ही घटना पाहण्यासाठी अकोलेकरांनी मोठी गर्दी केली होती. 

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The snake swallowed the frog but then vomited

Tags
टॉपिकस
Topic Tags: