बैलाच्या निधनाचा दहा दिवस दुखवटा; प्रवचन, अन्नदानाने दशक्रिया करुन परिवाराने केली कृतज्ञता व्यक्त

सुनील गर्जे 
Wednesday, 2 September 2020

बैल हा शेतीव्यवस्थेचा कणा आहे. शेतीच्या मशागतीसाठी जुंपलेली बैलजोडी व त्यांच्यासोबत कष्ट करणारा बळीराजा या सवंगड्यांचं जिवाभावाचं नातं असतं.

नेवासे (अहमदनगर) : बैल हा शेतीव्यवस्थेचा कणा आहे. शेतीच्या मशागतीसाठी जुंपलेली बैलजोडी व त्यांच्यासोबत कष्ट करणारा बळीराजा या सवंगड्यांचं जिवाभावाचं नातं असतं.

याच नात्यातून नेवासे तालूक्यातील जळके खुर्द येथील एका शेतकऱ्याने आपल्या सोबत दोन- अडीच दशके शेतीत राबणाऱ्या  पिल्या (वय २७)  बैलाच्या मृत्यूनंतर त्याच्या अंत्यसंस्कारासह सर्वविधी पुरोहिताच्या उपस्थतीत तर केलेच पण आपल्या जिवा- भावाच्या पिल्या बैलाच्या दशक्रियाविधीला चक्क प्रवचनाचे आयोजन करून त्याच्या कृतज्ञात व्यक्त केली.

नेवासे तालुक्यातील जळके खुर्द येथील भिमा शिंदे यांच्या पिल्या बैलाचा सोमवारी (ता. २४) मृत्यू झाला. आयुष्याची सत्तावीस वर्ष आपल्या काष्टात वाटेकरी असलेल्या आपल्या लाडक्या पिल्याच्या अकस्मात मृत्यूने संपूर्ण शिंदे परिवार शोकसागरात बुडाला. दरम्यान घरातील एक सदस्यच गेल्याचे दुःख या परिवाराला झाले.

पशुधनाच्या मृत्यूनंतर त्यांचे मृतदेह रस्त्याच्याकडेला शेतात बांधावर किंवा नदी- नाल्यात फेकून दिल्याचे चित्र आपल्याला नेहमीच पाहायला मिळते.  मात्र शिंदे परिवाराने लहानपणापासून आपल्या शेता अंगणात खेळल्या बागडलेल्या व आपल्याबरोबरीने शेतात कष्ट केलेल्या आपल्या बैलाचे अंत्यसंस्कार एका पुरोहिताच्या उपस्थित विधिवत केले. ऐवढेच नाहीतर दहादिवस घरात दुखवटा पाळला.

एखाद्या व्यक्तिप्रमाणेच बैलाचा दशकियाविधी करण्याचेही या परिवाराने ठेवले. बुधवार (ता. २) जळके खुर्द येथील मारुती मंदिरासमोर दशक्रियाविधीनिमित्त पिल्याचा फोटो अग्रभागी ठेवून  प्रवचनकार हभप नाईक महाराज यांचे प्रवचन करण्यात आले. सकाळी प्रवचन सुरू असतांना दुसरीकडे पुरोहिताच्या उपस्थिती दशक्रियाविधीचा विधी झाला. यावेळी प्रवचनला उपस्थित राहून ग्रामस्थ शिंदे परिवाराच्या दुःखात सहभागी झाले. दरम्यान दशक्रियाविधीनिमित्त उपस्थित ग्रामस्थांना शिंदे परिवाराकडून अन्नदानही करण्यात आले.

दरम्यान या स्वार्थी जगात मनुष्यप्राणी असो या पाळीव प्राणी त्यांच्याविषयी तेवढी कृज्ञात व्यक्त करण्याची नम्रता व ताकद फक्त शेतकऱ्यांतच असते हे शिंदे परिवाराने आपल्या लाडक्या पिल्याविषयी व्यक्त केलेल्या कृतज्ञतेवरून नक्कीच खरे आहे.

पिल्या म्हणजे आमच्या परिवारातील सदस्यच. वयाची सत्तावीस वर्ष तो आमच्या बरोबर होता. ,पोटच्या पोराप्रमाणे त्याला घरातील सर्वांनीच लहानपणापासून आत्तापर्यंत जीव लावला. तो आमच्या कष्टाचा वाटेकरी होता. सुखदुःखात त्याने आम्हाला साथ दिली.  पिल्या गेल्याचे आम्हाला तीव्र दुःख असून त्याच्या कष्टातून फेड होणे शक्य नाही. मात्र त्याच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीहे विधी केले. 
- भीमराव शिंदे, शेतकरी, जळके खुर्द, ता. नेवासे 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Social program due to death of bull in Jalke Khurd in Nevasa taluka