धरणीमाता तुम्हा घालते साद : मृदा प्रदूषणाचा प्रश्‍न गंभीर; मातीपरीक्षणाची आवश्‍यकता

दौलत झावरे
Saturday, 5 December 2020

शेतीच्या व्यापारीकरणामुळे मृदा प्रदूषणाचा प्रश्‍न गंभीर झाला आहे.

अहमदनगर : शेतीच्या व्यापारीकरणामुळे मृदा प्रदूषणाचा प्रश्‍न गंभीर झाला आहे. त्यात जमिनीचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी मृदापरीक्षण आवश्‍यक आहे. मातीपरीक्षणामुळे जमिनीचा प्रकार, भौतिक, रासायनिक, कायिक गुणधर्म, अन्नद्रव्यांची उपलब्धता समजते. त्यानुसार जमिनीतील हवा- पाण्याचा समतोल राखता येतो. 

मृदआरोग्यपत्रिका अभियानांतर्गत सहा वर्षांचा आढावा घेतल्यास, मातीपरीक्षण नमुन्यांची संख्या 2016-17 मध्ये दीड लाखावर गेली होती. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेतील शेतकरी मातीपरीक्षणाचा लाभ घेतात. त्यामुळे 2019-20मध्ये मातीपरीक्षण करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या अवघी 12 हजार 295 होती. राष्ट्रीय शाश्‍वत शेती अभियानात मृदाआरोग्यपत्रिका योजनेंतर्गत 2020-21मध्ये नगर जिल्ह्यातील 14 तालुक्‍यांतून प्रत्येकी 10, अशी 140 गावे निवडण्यात आली. 

पिकांनुसार खताची मात्रा देण्यासाठी प्रत्येक गावातील जमीन सुपीकता निर्देशांक ग्रामपंचायत स्तरावर लावण्याच्या सूचना दिल्या आहेत. या योजनेत मृदा आरोग्यपत्रिकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जमिनीतील रासायनिक गुणधर्मांची स्थिती, प्रमुख अन्नद्रव्यांची पातळी व सूक्ष्म मूलद्रव्यांची कमतरता, त्यानुसार पिकांना खतांची मात्रा देण्यासाठी प्रात्यक्षिकांचे आयोजन व प्रशिक्षण या घटकातून देण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा मृदसर्वेक्षण व मृदचाचणी अधिकारी जी. एच. तळोले यांनी दिली. 

रासायनिक खतांचा होत असलेला अनिर्बंध वापर कमी करून मातीपरीक्षणाच्या अहवालावरून अन्नद्रव्यांच्या कमतरतेनुसार, खतांच्या संतुलित व कार्यक्षम वापरास प्रोत्साहन देऊन उत्पादनखर्च कमी करण्याचे उद्दिष्ट कृषी विभागाने निश्‍चित केले आहे. सोबतच मातीचे आरोग्य सुधारण्यासाठी जैविक खते, सेंद्रिय खते, गांडूळखत, निंबोळी, सल्फर व युरियासारख्या संथ गतीने नत्रपुरवठा करणाऱ्या खतांच्या वापरास प्रोत्साहन देऊन, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनाद्वारे पीकउत्पादकतेत वाढ करण्याचा उद्देश आहे, असे तळोले यांनी सांगितले. 

वर्षनिहाय मातीपरीक्षण नमुन्यांची संख्या 
वर्ष नमुन्यांची संख्या 

2015-16 92,912 
2016-17 1,50,362 
2017-18 1, 10,399 
2018-19 1,26,792 
2019-20 12,295 

मातीपरीक्षणाचा खर्च (रुपयांत) 
सर्वसाधारण मातीनमुने - 35 
विशेष मातीनमुने - 275 
सूक्ष्म मूलद्रव्ये नमुने - 200 
पाणीनमुने तपासणी - 50 

नगर जिल्ह्यातील सर्व तालुक्‍यांत झिंक, फेरस, सूक्ष्म मूलद्रव्यांची कमतरता दिसून येते. तसेच, मातीत चुन्याचे प्रमाण 10 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त असेल, तर लिंबूवर्गीय फळबागांची लागवड करू नये. त्यामुळे शेतकऱ्यांनी मातीपरीक्षण करूनच खतांचा वापर करावा. त्यातून उत्पादनखर्च कमी करून जमिनीची सुपीकता कायम ठेवता येईल. 
- जी. एच. तळोले, जिल्हा मृदसर्वेक्षण व मृदचाचणी अधिकारी 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Soil testing is essential for good soil health