esakal | कोरोनाचा तांडव, बातम्या आणि मोबाईल; मन सुन्न करणारं वास्तव

बोलून बातमी शोधा

Mobile
कोरोनाचा तांडव, बातम्या आणि मोबाईल; मन सुन्न करणारं वास्तव
sakal_logo
By
मार्चंड बुचुडे

पारनेर (अहमदनगर) : सकाळी उठल्यावर पहिल्यांदा मोबाईल हातात घेऊनच व्हॉट्सअप व फेसबुक चाळूनच अनेकांच्या दिवसाची सुरूवात व शेवटही होत असतो. मात्र सध्या कोरोनामुळे अनेक जवळचे मित्र नातेवाईक आप्तस्वकीयांच्या निधनाच्या व श्रद्धांजलीच्या बातम्यावरच जास्त पोस्ट होत अ्सल्याने आता सकाळी मोबाईल हातात घेऊन अनेकांना तो पाहावासा वाटत नाही. सकाळी जाग आल्यानंतर मोबाईल हातात घेऊन तो पाहण्यास सुरूवात करताना हात सुद्धा थरथर कापत आहेत.

जगभरात अल्पावधीत कोट्यावधी लोकांचे लोकप्रिय व आवडते व्हॉट्सअप व फेसबुक हे साधन बनले आहे. टाईमपास, मनोरंजनसह, विविध प्रकारच्या माहितीचा खजिना असलेले, ज्ञान मिळविण्याचे, माहितीच्या देवाणघेवाणीचे व एकमेकांना जलद संदेश पाठविण्याचे साधन म्हणजे व्हॉट्सअप व फेसबुक झाले आहे. अनेकांचे ते दिवसभरासाठीचे मनोरंजनाचे व टाईमपासचे साधन बनले आहे. मात्र जगभरातच नव्हे तर देशात, राज्यात आणि थेट गावागावात कोरोना महामारी पोहचल्याने मृत्यूचे तांडव सुरू झाले आहे. कोरोनाच्या पहिल्या टप्प्यात मृत्यू दर कमी होता. मात्र दुस-या टप्प्यात तो वाढलेला दिसत आहे. त्यातच पहिल्या टप्प्यात वयोवृद्ध रूग्णांचे व मृत्यूचे प्रमाण अधिक होते. आता मात्र तरूण रुग्णांचा तसेच तरुणांच्या मृत्यूचे प्रमाणही कोरोना आजारात वाढलेले दिसत आहे.

कोरोना महामारी सुरू होण्यापुर्वी अनेकांची सकाळ उठल्यावर भल्या पहाटेच हातात मोबाईल घेऊन त्यावरील व्हॉट्सअप व फेसबुक चाळाणारे तरूणांसह अबालवृ्ध्द सुध्दा मोठ्या प्रमाणात आहेत. अनेकांच्या दिवसाची सुरूवातच व्हॉट्सअप व फेसबुकने होत असते व त्या दिवसाचा शेवटही रात्री उशीराने त्यानेच होत असतो.

मात्र सध्या कोरोनाच्या महामारीमुळे दररोज एखाद्या तरी जवळच्या नातेवाईक मित्र माहितीमधील महान व्यक्तीच्या दुःखद निधनाची बातमी व्हॉट्सअप व फेसबुकवर पडलेली असते. दररोज अशा बातम्या सकाळी ऊठल्याबरोबर पाहिल्या नंतर अनेकांना धक्क बसतो, त्याचा परिणाम आता अनेकांनी सकाळी लवकर मोबाईल हातात घेणेच बंद केले आहे. अनेकांचे अकाली निधन होणे, एकाच कटुंबातील एकापेक्षा अधिक लोकांचे निधन, तरूण मुलांचे निधन अशा चटका लावणा-या पोस्ट वाचून अनेकांना धक्का सहन होत नाही. त्यामुळे अनेकांनी आता व्हॉट्सअप सकाळी न पहाता ऊशीराने चहा नाष्टा झाल्यावर मोबाईल हातात घेऊन पाहण्यास सुरूवात केली आहे.

कोरोनाच्या भयानक स्थितीत दिवसेंदिवस वाढता रूग्णांचा व मृत्यूचा आकडा तसेच बेडसह ऑक्सिजन व रेमडीसिव्हर तुटवडा अशा बातम्या पाहून अनेकांना धक्का बसत आहेत. लहान मुलेही त्या बातम्या पाहताना अनेक प्रश्न घरातील वडीलधा-या माणसांना विचारून भंडाऊन सोडत असल्याने अनेकांनी दूरचित्रवाणीवरील बातम्या पाहण्याचेसुद्धा बंद केले आहे.