मढीत कानिफनाथांचे लवकरच अॉनलाईन दर्शन

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 12 December 2020

व्यापारी गाळे, पन्नास खाटांचे व अत्याधुनिक सुविधा असलेले रुग्णालय, दोन एकर जागेत सुंदर बगीचा, साठ खोल्यांचे भक्तनिवास, पार्किंगची सुविधा चांगले रस्ते या सुविधा देण्यासाठी प्राधान्य देऊ.

पाथर्डी : तालुक्‍यातील मढी येथे कानिफनाथ महाराजांचे ऑनलाइन दर्शनाची सुविधा सुरू करण्यात येत आहे. भक्तनिवास, रुग्णालय, बगीचा व मंगल कार्यालय आणि मढी ते मायंबा रोप-वे अशा विविध सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कानिफनाथ देवस्थानचे विश्वस्त मंडळ काम करणार असल्याचे प्रतिपादन देवस्थानचे अध्यक्ष संजय मरकड यांनी केले. 

मढीच्या कानिफनाथ गडावर देवस्थानने सुरू केलेल्या 'हिरकणी' कक्षाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. विश्वस्त ऍड. शिवजित डोके, बबन मरकड, रवींद्र आरोळे, विमल मरकड, भाऊसाहेब मरकड, डॉ. विलास मढीकर, नवनाथ मरकड, श्‍याम मरकड, मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक पवार, बाबासाहेब मरकड, मंदाकिनी शेळके उपस्थित होते. 

संजय मरकड म्हणाले, की भाविकांना मढी येथे सात्त्विक आनंदासोबत पर्यटनाचा आनंद कसा घेता येईल, यासाठी मढी ते मायंबा रोप-वेची सुविधा उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे.

व्यापारी गाळे, पन्नास खाटांचे व अत्याधुनिक सुविधा असलेले रुग्णालय, दोन एकर जागेत सुंदर बगीचा, साठ खोल्यांचे भक्तनिवास, पार्किंगची सुविधा चांगले रस्ते या सुविधा देण्यासाठी प्राधान्य देऊ. पिण्याचे पाणी योजना करण्यात येईल. प्रास्ताविक ऍड. शिवजित डोके यांनी केले. अशोक पवार यांनी आभार मानले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Soon online visit of Kanifnath at Madhi