esakal | ऊन- पावसात प्रवासी पाहतात बसची वाट; नवीन बसस्थानकाची अजूनही प्रतिक्षाच 
sakal

बोलून बातमी शोधा

ST bus stand in Shevgaon closed for six months

शेवगाव शहरातील बसस्थानकाच्या नवीन इमारतीचे बांधकाम रखडल्याने प्रवाशांना ऐन पावसाळ्यात निवारा शोधण्याची वेळ आली.

ऊन- पावसात प्रवासी पाहतात बसची वाट; नवीन बसस्थानकाची अजूनही प्रतिक्षाच 

sakal_logo
By
सचिन सातपुते

शेवगाव (अहमदनगर) : शहरातील बसस्थानकाच्या नवीन इमारतीचे बांधकाम रखडल्याने प्रवाशांना ऐन पावसाळ्यात निवारा शोधण्याची वेळ आली. एसटी महामंडळाचे अधिकारी, पालिका व ठेकेदार यांच्यातील अवमेळाचा फटका प्रवाशांना बसला आहे. 

बसस्थानकाच्या दोन कोटी 55 लाख खर्चाच्या नवीन बांधकामाचा प्रारंभ तत्कालीन परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्या हस्ते 31 डिसेंबर 2019 झाला. त्यानंतर 4 जानेवारीला कामास सुरवात झाली. पूर्वीची इमारत पाडून तेथे नवीन इमारतीचे काम सुरू झाले. प्रवाशांसाठी प्रतीक्षागृह, कर्मचाऱ्यांसाठी विश्रामगृह, कार्यालय, शौचालय, उपाहारगृह आदी सुविधा तेथे असणार आहेत.

बांधकामाचा पाया खोदून जमीनपातळीवर काम आल्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव झाला. सर्वत्र टाळेबंदी होताच ठेकेदाराला काम थांबवावे लागले. शिवाय, एसटी महामंडळातील वरिष्ठ अधिकारी, अभियंता यांनी सुरवातीपासून कागदोपत्री पूर्तता व कामाबाबत कठोर धोरण अवलंबिल्याने ठेकेदाराला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. शिवाय, टाळेबंदीच्या काळात पालिकेकडून बांधकामास परवानगी न मिळाल्याने, सहा महिने काम बंद ठेवावे लागले. 

लॉकडाउनमुळे बससेवा बंद असल्याने त्याचा फारसा परिणाम जाणवला नाही. मात्र, आता बससेवा सुरू झाली आहे. प्रवाशांना निवारा नाही. ऊन- पावसात त्यांना बसची प्रतीक्षा करावी लागते. बांधकाम साहित्य व जुन्या इमारतीच्या दगड- मातीचे ढिगारे तेथेच पडून आहेत. त्याचाही त्रास प्रवाशांना सहन करावा लागतो. संबंधित ठेकेदाराला या कामासाठी एक वर्षाची मुदत दिली होती. मात्र, त्यातील सहा महिन्यांपेक्षा जास्त कालावधी लोटला असताना, बांधकाम जमीनपातळीपर्यंतही आलेले नाही. त्यामुळे हे काम किती दिवसांत पूर्ण होईल, याबाबत अनिश्‍चितता आहे. 

नगर एसटी महामंडळाचे विभागीय अभियंता शीतल शिंदे म्हणाल्या, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या शासकीय निर्बंधांमुळे बांधकाम थांबविले होते. आता काम सुरू केले असून, ठेकेदारालाही बांधकाम पूर्ण करण्यासाठी मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव कार्यकारी अभियंत्यांकडे पाठविला आहे.  

ठेकदार बाळासोहब मुरदारे म्हणाले, विविध परवानग्या व कोरोनामुळे बांधकामात व्यत्यय आला. मात्र, आता कामास सुरवात झाली. लवकरच दर्जेदार बांधकाम करण्यात येईल. 

संपादन : अशोक मुरुमकर