बाळासाहेब देशपांडे रूग्णालयाचे कर्मचारी वैतागले

अमित आवारी
Thursday, 15 October 2020

बाळासाहेब देशपांडे रुग्णालयात अपूरा कर्मचारी वर्ग व हॉस्पिटल दुरुस्तीसाठी निधी न मिळाल्याने त्याची दुरवस्था झाली आहे. जिल्हा रुग्णालयाने कोरोनामुळे प्रसुती रुग्ण घेणे बंद केले. त्यामुळे देशपांडे रुग्णालयावरील कामाचा ताण वाढला.

नगर ः महापालिकेच्या बाळासाहेब देशपांडे प्रसुतीगृह व रुग्णालयातील कर्मचारी अतिरिक्‍त काम व अनियमित वेतनामुळे त्रस्त झाले आहेत. आज सकाळी त्यांनी महापालिका प्रशासनाला संपाचा इशारा दिला. 

बाळासाहेब देशपांडे रुग्णालयात अपूरा कर्मचारी वर्ग व हॉस्पिटल दुरुस्तीसाठी निधी न मिळाल्याने त्याची दुरवस्था झाली आहे. जिल्हा रुग्णालयाने कोरोनामुळे प्रसुती रुग्ण घेणे बंद केले. त्यामुळे देशपांडे रुग्णालयावरील कामाचा ताण वाढला.

येथे रोज किमान 15 प्रसुती होतात. त्यात रुग्णालयात केवळ 53 अधिकारी-कर्मचारी कार्यरत आहेत. त्यातील अनेक कर्मचारी पन्नाशीच्या पुढील आहेत. 39 पदे रिक्‍त असल्याने अधिकारी-कर्मचाऱ्यांवर अतिरिक्‍त ताण येतो. 2012पासून 12 कर्मचारी निवृत्त झाले. ती पदे भरलेली नाहीत. तात्पुरत्या घेतलेल्या कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार मिळत नाही. त्यांच्याकडूनही अतिरिक्‍त काम करून घेण्यात येत असल्यानेही तेही त्रस्त आहेत. 

रुग्णालय प्रशासनाने महापालिकेला मे महिन्यात 39 पदे भरण्याचा प्रस्ताव दिला होता. राज्य सरकारने भरतीची मुभा दिली असताना, महापालिका आयुक्‍तांनी पदभरतीचा प्रस्ताव फेटाळल्याचा आरोप महापालिका कामगार संघटनेने केला आहे. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी आज सकाळी अचानक आंदोलनाचा पवित्रा घेतला.

युनियनचे अध्यक्ष अनंत लोखंडे यांनी वैद्यकीय अधिकारी डॉ. सतीश राजूरकर यांची भेट घेऊन आंदोलनाचा इशारा देत मागण्या मांडल्या. आयुक्‍त श्रीकांत मायकलवार यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा केली. नगरसेवक बाळासाहेब बोराटे उपस्थित होते. 

रुग्णालयात तातडीने तीन निवासी डॉक्‍टर, एक स्त्री रोगतज्ज्ञ, एक लॅब टेक्‍निशियन, 11 परिचारिकांची भरण्यासह नऊ मागण्या कामगार संघटनेने केल्या आहेत. त्या सात दिवसांत पूर्ण न झाल्यास, रुग्णालयातील अत्यावश्‍यक सेवा बंद करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे. 

बंद रक्‍तपेढीत पूर्ण स्टाफ 
देशपांडे रुग्णालयात कर्मचारी कमी आहेत. दुसरीकडे महापालिकेतील रक्‍तपेढी बंद असताना, तेथे तीन लॅब टेक्‍निशियन व तीन परिचारिकांची नेमणूक आहे. रक्‍तपेढीतील कर्मचारी देशपांडे रुग्णालयात वर्ग करण्याची मागणी कामगार संघटनेने केली. 

बंद कोविड सेंटरमध्ये बेड 
देशपांडे रुग्णालयातील प्रसुती विभागातील बेड एम्स हॉस्पिटलमधील कोविड सेंटरसाठी महापालिका प्रशासनाने नेले होते. आता एम्स हॉस्पिटलमधील सेंटर बंद झाले असले, तरी बेड तेथेच आहेत. दुसरीकडे देशपांडे रुग्णालयात बेड अपुरे पडत आहेत. 

रिक्‍त पदे 
वैद्यकीय अधीक्षक 1, वैद्यकीय अधिकारी 3, स्त्री रोगतज्ज्ञ एक, बालरोग तज्ज्ञ एक, भूलतज्ज्ञ एक, परिचारिका सहा, सहायक परिचारिका 8, दायी 2, आया 9, लॅब टेक्‍निशियन 2, शिपाई 3, सफाई कामगार 2. 

बाळासाहेब देशपांडे हॉस्पिटलची दुरवस्था करून, त्याचे खासगीकरण करण्याचा घाट महापालिका प्रशासन घालत असल्याचा संशय येतो. 
- अनंत लोखंडे, अध्यक्ष, महापालिका कामगार संघटना 

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The staff of Balasaheb Deshpande Hospital was annoyed