
गावकरी केवळ स्वतःचं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी व वर्चस्व दाखवण्यासाठी दोन पार्ट्याचा गाव चार-पार्ट्यात विभागला जातो. आम्हीच गावाचा उद्धार करू, म्हणाऱ्यांमुळे गावात वजाबाकीचे राजकारण सुरू होते.
नगर तालुका ः गावाला प्रगतीच्या शिखरावर नेणाऱ्या आणि उध्वस्तही करणाऱ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांची रणधुमाळी राज्यात सर्वत्र सुरु झाली आहे. गावाचे खरे रूप या निवडणुकीतून पहायला मिळते. गावाचा इतिहास आणि अर्थशास्त्र जपायचे असेल तर ग्रामपंचायतीच्या निवडणूका बिनविरोध करणे गरजेचे आहे.
गावकरी केवळ स्वतःचं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी व वर्चस्व दाखवण्यासाठी दोन पार्ट्याचा गाव चार-पार्ट्यात विभागला जातो. आम्हीच गावाचा उद्धार करू, म्हणाऱ्यांमुळे गावात वजाबाकीचे राजकारण सुरू होते.
राजकीय अस्तित्व दाखवण्यासाठी कधीही पुढे न आलेले स्वतःचा झेंडा पुढे करतात आणि ऐन निवडणुकीच्या हंगामात स्वतःला 'स्वयंघोषित नेते' समजू लागतात. ग्रामपंचायत निवडणूक सुरू झाली की एका घराचे दोन तुकडे ठरलेलेच असतात.
भाऊ-भाऊ आणि सासू-सुना एकमेकांशी बोलणे टाळू लागतात. शेजारच्या घरीही संशयाने पाहिले जाते. गावात दारू आणि पैशांचा पूर येतो. गावाच्या विकासासाठी कधीही मोठी वर्गणी न देणारे लोक यात लाखो रुपयांची उधळण करतात. हे भयावह चित्र गावगाड्याला नेहमीच मारक ठरत आले.
गावाच्या बाहेर बैठकी होतात. शेतात पार्ट्या होतात. कधीही न विचारणारे एकमेकांना 'कसं काय चाललंय भाऊ' म्हणून विचारू लागतात. निवडणूकीतून सावरायला पुढील पाच वर्षे निघून जातात, अशी अनेक गावांची उदाहरणे आहेत.
पाच वर्षे निघून जातात तरीही विकासाचा मुद्द नेमका डिक्लेर झालेला नसतो. एक साधे अभियानही राबवण्याची धमक नसलेले लोकप्रतिनिधी गावाचा खरोखरच उद्धार करतील का ? असा प्रश्न आहे. मग ग्रामपंचायत बिनविरोध करण्यास विरोध करणाऱ्यांना लोकांनी का धारेवर धरू नये.
सध्या कोरोनाचा काळ आहे. आधीच आर्थिक मंदी असताना आपापल्या गावात निवडणुकीचे भोंगे का वाजू द्यावेत ? का गावाला नासवणाऱ्या प्रत्येक वार्डावार्डात बैठका होऊ द्याव्यात? राजकारण हे खऱ्या अर्थाने गचकरणासारखं असतं, हे आपण का ओळखू नये.
गावातील तंटे गावातच मिटवायचे असतील आणि पुढची पाच वर्ष नव्हे तर वर्षानुवर्षे गावात शांततेचे वातावरण ठेवायचे असेल तर खऱ्या अर्थाने राजकीय पक्षापेक्षा गावकऱ्यांनी गावाचे पुढारी नेमावेत. ग्रामसभा सार्वभौम आहे.
राज्य घटनेला प्रमाण मानून गावाच्या हितासाठी पुढाकार घेऊन निवडणूका बिनविरोध व्हाव्यात ही प्रत्येक गावाची गरज आहे. शक्य झाल्यास उमेदवारांकडून स्टॅम्प पेपरवर गावाने केलेले नियम व जबाबदारी ग्रामसभेत लिहून घ्यावी. योग्य वर्तन नसेल तर राजीनामा देण्यासाठी भाग पाडावे. अर्थात गावाने ठरवले तर काहीही शक्य आहे.