राज्य सरकारला मराठ्यांना आरक्षणच द्यायचं नाही, स्नेहलता कोल्हेंची कारणमीमांसा

मनोज जोशी
Sunday, 20 September 2020

""आघाडी सरकार हा प्रश्न व्यवस्थित हाताळू शकले नाही. आरक्षणासाठी प्रामाणिक प्रयत्न करणाऱ्या फडणवीस यांच्यावर काही संकुचित नेत्यांनी ते "ब्राह्मण' म्हणून वातावरण कलुषित करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. 

कोपरगाव : ""मराठा समाजातील अनेक नेते राज्याच्या राजकारणात आहेत. मराठा समाजाचे बहुसंख्य आमदार सरकारमध्ये प्रतिनिधित्व करतात. मंत्रिपदेही भूषवीत आहेत; मात्र मराठा आरक्षणाबाबत उदासीनतेमुळे ही नेतेमंडळी समाजाला न्याय देऊ शकत नाही. या उदासीन सरकारला मराठा समाज कदापि माफ करणार नाही,'' अशी टीका भाजपच्या प्रदेश सचिव, माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी केली. 

त्या म्हणाल्या, ""मराठा आरक्षणासाठी राज्यभर आंदोलने झाली, मोर्चे निघाले. या प्रश्नाची तीव्रता लक्षात घेऊन माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यात विशेष लक्ष घातले. उच्च न्यायालयात आरक्षण टिकेल असे प्रयत्न केले; परंतु या सरकारच्या काळात राज्यकर्त्यांनी या विषयाकडे गांभीर्याने पाहिले नाही. त्यामुळेच आरक्षणास सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली.'' 

""आघाडी सरकार हा प्रश्न व्यवस्थित हाताळू शकले नाही. आरक्षणासाठी प्रामाणिक प्रयत्न करणाऱ्या फडणवीस यांच्यावर काही संकुचित नेत्यांनी ते "ब्राह्मण' म्हणून वातावरण कलुषित करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. 

जनतेचा कौल नसताना सत्तेसाठी जुगाड जमवून अपघाताने आलेले हे सरकार एकमेकांचे रुसवे-फुगवे काढण्यात आणि अधिकाऱ्यांच्या बदल्या करून आर्थिक सोयीचे निर्णय घेण्यात मग्न आहे. पोलिसभरतीचा निर्णय घेऊन मराठा समाजाच्या युवकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम सरकार करीत आहे,'' असा आरोपही कोल्हे यांनी केला. 

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The state government does not want to give reservation to Marathas, Snehalta Kolhe alleges