पिंपरखेडच्या भापकर गुरुजींची राज्यास्तरीय विचारगटात निवड, नगरच्या तिघांचा समावेश

The state level think tank includes three from Ahmednagar district.jpg
The state level think tank includes three from Ahmednagar district.jpg

जामखेड (अहमदनगर) : राज्याच्या शिक्षण क्षेत्रात आधुनिक शिक्षणपद्धती राबविणे. मुलांच्या गुणवत्ता विकसित करणे. येणाऱ्या अडचणींवर उपाय शोधणे व शिक्षणाचा सर्वांगीण विकास करून मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी सूचना व मार्गदर्शन करणे. तसेच योजनांची शिफारस करण्यासाठी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या सुचनेनुसार स्थापन केलेल्या राज्यस्तरीय विचारगटात सरदवाडी (ता.जामखेड) च्या जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षक रवींद्र भापकर यांचा समावेश झाला आहे. विशेष म्हणजे तीस व्यक्तींच्या या 'विचार गटात' जिल्ह्यातील तीन सुपुत्रांचा समावेश आहे. ही गौरवाची आणि अभिमानाची 'बाब' ठरली आहे.

ग्रामीण भागात जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत स्वतः शिक्षणाचे धडे गिरवलेले रवींद्र भापकर हे पिंपरखेड (ता.जामखेड) येथील रहिवासी. जिल्हा परिषद प्राथमिक विभागात शिक्षक म्हणून जामखेड तालुक्यात रुजू झाले ते ही केवळ पाचशे लोकवस्ती असलेल्या सरदवाडी येथील द्विशिक्षकी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत. मात्र भापकर गुरुजी येथे रुजू झाले आणि शाळेचे रुपच पालटले. त्यांनी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम येथे राबविले. ही शाळा जगाच्या नकाशावर ठळकपणे पोहचली ते भापकर गुरुजींच्या परिश्रमामुळे. त्यांच्या कार्याचा गौरव सरकारने 'राष्ट्रपती पुरस्काराने केला.

त्यांच्या कडे असलेल्या कौशल्याचा शिक्षणक्षेत्राला उपयोग व्हावा, याकरिता राज्याच्या शिक्षण विभागाने त्यांना 'राज्याच्या विचारगटात'  समाविष्ट केले. अशा प्रकारची संधी मिळणारे भापकर गुरुजी तालुक्यातील पहिले मानकरी ठरले आहेत. शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांच्या अध्यक्षतेखाली हा राज्यस्तरीय विचारगट काम करणार आहे. 

राज्यातील नामवंत शिक्षणतज्ञ, वरिष्ठ अधिकारी, उपक्रमशील शिक्षक अशा 30 सदस्यांचा या विचारगटात समावेश आहे. भापकर यांच्याबरोबरच महाराष्ट्र राज्य शिक्षण संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक दिनकर टेमकर (भोसे ता.पाथर्डी), वीरगाव (ता.अकोले) जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक भाऊसाहेब सखाराम चासकर या नगर जिल्ह्यातील सुपुत्रांचा समावेश आहे. विशेष  म्हणजे टेमकर यांनी जामखेडला गटशिक्षणाधिकारी तर नगरला शिक्षणाधिकारी म्हणून उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे. त्यांनी जिल्हा परिषद शाळेत सेमी इंग्लिश शिकवण्यावर अधिक प्रभावी काम केले होते. तसेच शाळांची गुणवत्ता सुधारण्यामध्ये महत्त्वाचे योगदान होते. त्यांच्यावर या विचारगटाच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी आहे.

भापकरांवर आहेत अन्य जबाबदाऱ्या

राज्य शासनाद्वारे घेतल्या गेलेल्या राज्यस्तरीय सोशल मीडिया महामित्र या स्पर्धेत राज्यातून सर्वाधिक गुण मिळवून प्रथम क्रमांकाने त्यांची निवड झालेली आहे. याबद्दल मुख्यमंत्र्यांनी त्यांना गौरविले आहे. अध्यापनात तंत्रज्ञानाचा वापर याबाबत त्यांनी राज्यभर शिक्षक कार्यशाळा घेवून हजारो शिक्षकांना प्रशिक्षित केलेले आहे. सध्या ते NCERT दिल्ली यांच्या वतीने राष्ट्रीय मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी विद्यार्थ्यांसाठी विविध शैक्षणिक ऍप तयार केले असून त्यांच्या www.ravibhapkar.com संकेतस्थळाचा वापर लाखो शिक्षक, विद्यार्थी नियमित करतात.
    
भाऊसाहेब चासकर हे अकोले तालुक्यातील विरगाव येथील प्राथमिक शाळेत कार्यरत असून यापूर्वी त्यांनी राज्य अभ्यासक्रम पुनर्रचना समितीमध्ये काम केलेले आहे. प्राथमिक शिक्षणात विविध उपक्रम राबविणारे प्रयोगशील शिक्षक आणि वंचित मुलांच्या शिक्षण हक्कासाठी कार्यरत असलेला कार्यकर्ता अशी त्यांची ओळख आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांच्या प्रतिमासंवर्धनसाठी अकोले तालुक्यात राबविलेल्या 'आपली शाळा मराठी शाळा' या उपक्रमात चासकर यांचे उल्लेखनीय योगदान आहे. राज्याच्या शिक्षणात कार्यरत असलेल्या एक्टिव टीचर्स फोरम या गटाचे ते संयोजक आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com