दिवाळीसाठी पामतेल, साखरेसह डाळ देण्याची मागणी

गौरव साळुंके
Saturday, 17 October 2020

यंदा गोरगरीबांची दिवाळी गोड होण्यासाठी सण-उत्सवासाठी आवश्यक वस्तू सरकारने स्वस्त धान्य दुकानात द्याव्यात. अन्न सुरक्षा कार्ड धारकांसह केशरी कार्डधारकांनाही वस्तू माफक दरात मिळ्याव्यात.

श्रीरामपूर (अहमदनगर) : दिवाळीच्या सणासाठी सरकारने स्वस्त धान्य दुकानातून अन्न सुरक्षा कार्डधारकांना पामतेल, साखरेसह हरभरा डाळ देण्याची मागणी हिंदू एकता आंदोलन पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुदर्शन शितोळे यांनी केली आहे. 

सणउत्सव काळात महागाईचा फडका उडाला असून नवरात्रौत्सव सुरु झाला आहे. विजयादशमी झाल्यानंतर दिवाळीचा सण-उत्सव येत असून सरकारने रेशन कार्डधारकांना स्वस्त धान्य दुकानावर पामतेल, साखरेसह हरभरा डाळ उपलब्ध करुन द्यावी. गेल्या सहा महिन्यांपासून कोरोनामुळे कहर सरु आहे. सामान्य नागरिकांची मोठी आर्थिक होरपळ झाली आहे. अनेकांच्या हातातील काम गेल्याने बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे.

यंदा गोरगरीबांची दिवाळी गोड होण्यासाठी सण-उत्सवासाठी आवश्यक वस्तू सरकारने स्वस्त धान्य दुकानात द्याव्यात. अन्न सुरक्षा कार्ड धारकांसह केशरी कार्डधारकांनाही वस्तू माफक दरात मिळ्याव्यात. तरच यंदाची दिवाळी गरीबांसाठी गोड होणार आहे. यासंदर्भात पक्षाच्यावतीने प्रांताधिकारी अनिल पवार यांना निवेदन दिल्याचे शितोळे यांनी सांगितले.

तसेच अन्न व पुरवठामंत्री छगन भुजबळ यांच्याकडे वरील मागणीचा पाठपुरावा करणार असल्याचे शितोळे म्हणाले. निवेदनावर शहराध्यक्ष मंगेश छतवाणी, अमिर जहागीरदार, मनोहर बागुल, चिलिया तुवर, वसंत गायकवाड, विजय जगताप, नागनाथ डोंगरे, राजेंद्र जाधव, शिवाजी फोफसे, जयराम क्षीरसागर यांच्या सह्या आहेत.

संपादन - सुस्मिता वडतिले 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: State President of Hindu Ekta Andolan Sudarshan Shitole has demanded to provide gram dal along with sugar to the food security card holders