कुटूंबात अन्‌ समाजातही आश्रय मिळेना... मग आम्ही जगायचं कसं

सचिन सातपुते
Sunday, 9 August 2020

कुठल्याच प्रकारची शिधापत्रिका नाही. त्यातच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठांवर लागू असलेल्या निर्बंधांमुळे आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.

शेवगाव (अहमदनगर) : कुठल्याच प्रकारची शिधापत्रिका नाही. त्यातच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठांवर लागू असलेल्या निर्बंधांमुळे आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. आम्हाला त्वरीत शिधापत्रिका देवून शासकीय योजनांचा लाभ मिळवून दयावा, अशी मागणी तृतीयपंथीय संघटनेने तहसिलदार अर्चना भाकड यांच्याकडे केली आहे.

तृतीयपंथीयांनी निवेदनात म्हटले आहे की, आम्ही शेवगाव येथील कायमस्वरुपी रहीवाशी आहोत. विविध शासकीय योजनांसाठी शिधापत्रिकेची आवश्यकता आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बहुतांश वेळा बाजारपेठ बंद असल्याने उपजीवीकेचे साधन बंद झाले आहे.

कुटूंबात आणि समाजातही आश्रय मिळत नाही, अशा परिस्थितीत शिधापत्रिका नसल्याने शासकीय धान्य योजनेचा व इतर कुठल्याही प्रकारचा लाभ मिळत नाही. त्यामुळे सध्या आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. शहरातील तृतीय पंथींची संख्या जास्त असून सर्वांना त्वरीत रेशनकार्ड उपलब्ध करुन दयावे. 

निवेदनावर रेशमा अण्णा गायकवाड, शितल काजल गुरु, मयुरी रेखा गुरु, सायली रेखा गुरु, रविना रेशमा गुरु आदींच्या सहया आहेत. 

सदयस्थितीत शहरातील तृतीय पंथींयांना धान्य वाटप करण्याची तात्पुरती व्यवस्था करण्यात येईल. आवश्यक त्या कागदपत्रांच्या पुर्ततेनंतर त्यांना शिधापत्रिकाही देण्यात येतील.
- अर्चना भाकड, तहसिलदार, शेवगाव 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Statement to Tehsildar Archana Bhakad in Shevgaon to trilateral