सेवानिवृत्तीनंतरही जोपासला छंद! कृषी अधिकाऱ्यानी निसर्ग उपचार केंद्रात जपली 145 जातीची 750 दुर्मिळ व औषधी वनस्पती 

सनी सोनावळे
Sunday, 4 October 2020

कृषी विभागामध्ये मंडलधिकारी म्हणून सेवानिवृत्त झालेले टाकळी ढोकेश्वर येथील तारकराम झावरे यांनी 11 वर्षाच्या कालावधीत जवळपास 145 जातीची दुर्मिळ व औषधी वनस्पती चे संगोपन करून एक आगळावेगळा प्रयोग टाकळी ढोकेश्वर येथे राबवला आहे.

टाकळी ढोकेश्वर (अहमदनगर) : कृषी विभागामध्ये मंडलधिकारी म्हणून सेवानिवृत्त झालेले टाकळी ढोकेश्वर येथील तारकराम झावरे यांनी 11 वर्षाच्या कालावधीत जवळपास 145 जातीची दुर्मिळ व औषधी वनस्पती चे संगोपन करून एक आगळावेगळा प्रयोग टाकळी ढोकेश्वर येथे राबवला आहे.

झावरे हे कृषी खात्यातुन सेवानिवृत्तीनंतर न थांबता त्यांनी टाकळीढोकेश्वर येथील स्वामी समर्थ मंदिराजवळ असणाऱ्या आपल्या सहा एकर जागेत संकल्प सिद्धी नावाने निसर्गोपचार केंद्र स्थापन केले असून अनेक मान्यवरांच्या हस्ते सुद्धा नवनवीन औषधी वनस्पतीची लागवड करून एक नवा आदर्श समाजापुढे उभा केला आहे.
औषधी वनस्पतींचे संवर्धन व गावातील जेष्ठ नागरिकांना विरंगुळा केंद्र व येणाऱ्या नव्या पिढीला या औषधी वनस्पतींची ओळख व्हावी यासाठी सहा एकर जागेत हे निसर्गोपचार केंद्र उभारण्यात आले. तरुणांना लाजवेल असे काम त्यांनी उभे केले आहे. मंडल कृषीधिकारी म्हणून काम करत असताना झावरे यांनी राहुरी येथील कृषी विद्यापीठातुन 145 जातीची 750 औषधी आयुवर्दे झाडे ही विविध क्षेत्रात कार्यरत असणा-या अधिकारी व पदाधिकारीच्या हस्ते लावण्यात आली आहे. या निर्सगोपचार केंद्रात येणा-या लोकांसाठी ही झाडे चर्चेचा व उत्सुकतेचा विषय बनला आहे.

भावी पिढीसाठी या झाडांची ओळख व्हावी हा उद्देश- तारकराम झावरे यांची प्रतिक्रिया खालील प्रमाणे अनेक वर्षाची मनात असलेली संकल्पना या निसर्गोपचार केंद्राच्या माध्यमातून प्रत्यक्षात साकारली असून सेवानिवृत्ती नंतर करायचे काय? हा प्रश्न उभा राहिला होता मात्र गावातील विलास गोसावी,किसन पायमोडे, विश्वनाथ लोंढे, वासुदेव साळुंखे यासंह अन्य सहका-यांच्या मदतीने साडेसातशे झाडांची लागवड करून संगोपन केले आहे त्यामुळे ही येणाऱ्या भावी पिढीसाठी या झाडांची ओळख व्हावी यासाठी हा अनमोल ठेवा उभा केला आहे.

कोणती झाडे आहेत या केंद्रात
या निसर्ग उपचार केंद्रात तुळस, हादगा, शमी, बेल, धोतरा, आघाडा, वड, पिंपळ, अंजीर, आवळा, चंदन, सत्य परभणी, काळा, पळस, बोर, आंबा, बकुळ, खैरव, उंबर, जांभूळ, बांबू, जुई, जाई, अर्जुन, निगडी, कदंब, मोह, आडुळसा, बेहर, रिठा पारिजातक, कांचन, खेरडा, अपरा, चिंच, चिकू, पेरू, मेहंदी, अशोक, बदाम, रामफळ, वावळा, मोरपंखी, शेवगा, चाफा, मोगरा,गुलमोर, शंकासुर, बहावा, गुंजाळ, नारळ, सब्जा, ओवा, कढीपत्ता, गवतीचहा, आवळा, नागीन, पाणी, गुळवेल, लक्ष्मी कमळ, ब्रह्मकमळ, लिली, कवळ, चेरी, गुलाब, रात्र आणि मधुमालती यासंह अन्य अशा दुर्मिळ वनस्पतींचे जवळपास साडेसातशे झाडांचे वृक्षारोपण करून गेल्या अकरा वर्षापासून त्याचे संवर्धन मोठ्या प्रमाणावर करण्यात आलेले आहे.  

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The story of Tarkaram Jhaware, a retired officer of the Agriculture Department at Takli Dhokeshwar