नाशिक-पुणे महामार्गावर तृतीय पंथियासाठी वाहन थांबवलं, सोबत काळही धावत आला

आनंद गायकवाड
Saturday, 7 November 2020

या दरम्यान पुण्याहून भरधाव वेगाने नाशिककडे निघालेल्या टेम्पोच्या ( एमएच.15 इएफ. 2999 ) चालकाचा समोरच्या विचित्र अपघाताची मालिका पाहून गोंधळ उडाला.

संगमनेर ः नाशिक - पुणे राष्ट्रीय महामार्गावरील घुलेवाडी शिवारातील हॉटेल स्टेटसच्या परिसरात आज दुपारी बाराच्या सुमारास तीन मोटार व एक टेम्पो अशा चार वाहनांचा विचित्र अपघात झाला.

या अपघातात रस्त्यावर पैशांचे दान मागणाऱ्या एका तृतीयपंथीयाला प्राण गमवावे लागले तर मोटारीतील पती पत्नी सह दुसऱ्या मोटारीतील एक तरुण जखमी झाले आहेत. या दुर्घटनेनंतर नाशिककडे जाणाऱ्या मार्गावरील वाहतूक काही काळ खंडीत झाली होती.

या बाबत अधिक माहिती अशी, संगमनेर शहरातून जाणारा जुना महामार्ग आणि नवीन बाह्यवळण महामार्गाला हॉटेल स्टेटसजवळ जोडणार्‍या रस्त्यावर नाशिककडे मार्गिकेवर आज सकाळी तिन तृतीयपंथीय वाहने थांबवून दान मागत होते.

या वेळी पुण्याहून नाशिकच्या दिशेने जाणारी मोटार ( एमएच.12 इएक्स. 2728 ) चालकाने महामार्गावरील रहदारीकडे दुर्लक्ष करीत, दान देण्यासाठी वाहन उभे केले. अचानक समोरचे वाहन उभे राहिल्याने त्यापाठीमागून आलेल्या दुसऱ्या ( एमएच.14 एचक्यू. 1728 ) ने पहिल्या वाहनाला पाठीमागून जोरदार धडक दिली.

याच वेळी त्याच्याही पाठीमागून आलेल्या ( एमएच.11 बीडी. 6093 ) या तिसऱ्या मोटारीच्या चालकाचा गोंधळ उडाल्याने त्यानेही अपघातग्रस्त दुसर्‍या वाहनाला पाठीमागून जोराची धडक दिली.

या अपघातात तीनही वाहनांचे मोठे नुकसान झाले. तर साई अंकिता साथी ( वय 50 ) रा. शिर्डी, ता. राहाता या तृतीयपंथीयाचा जागीच मृत्यू झाला, तसेच मोटारीतील शैलेश श्रीराम बिर्ला ( वय 52 ) व त्यांची पत्नी सोनल ( वय 46 ), रा. हडपसर, पुणे व गणेश अक्कर ( वय 32 ) रा. पुणे गंभीर जखमी झाले. या तिघांनाही खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे. 

या दरम्यान पुण्याहून भरधाव वेगाने नाशिककडे निघालेल्या टेम्पोच्या ( एमएच.15 इएफ. 2999 ) चालकाचा समोरच्या विचित्र अपघाताची मालिका पाहून गोंधळ उडाला. वाहनावर नियंत्रण मिळवण्याच्या गडबडीत त्याचे वाहन रस्त्याच्या दुभाजकावर चढल्याने पुढील अपघात टळला.

अपघाताची माहिती मिळताच शहर पोलिस निरीक्षक अभय परमार, वाहतूक शाखेचे उपनिरीक्षक भालचंद्र शिंदे व त्यांचे सहकारी तातडीने घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त वाहने बाजूला करुन वाहतुकीसाठी रस्ता खुला केला.

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Strange accident of four vehicles at Sangamner