esakal | निवडणुकांसाठी राष्ट्रवादी युवकने आखली "सुपर सिक्स्टी"ची रणनीती
sakal

बोलून बातमी शोधा

The strategy of "Super Sixty" was adopted by the NCP youth for the elections

शेख यांनी "कॉफी विथ सकाळ' या उपक्रमात शनिवारी (ता. 17) "सकाळ' कार्यालयास भेट देऊन संपादकीय "टीम'शी संवाद साधला. "सकाळ'चे कार्यकारी संपादक ऍड. डॉ. बाळ ज. बोठे पाटील यांनी सकाळ प्रकाशनाचे "राजकीय पत्रकारिता' हे पुस्तक भेट देऊन शेख यांचे स्वागत केले. शेख यांनी आपला राजकीय प्रवास उलगडतानाच पक्षाची ध्येयधोरणेही स्पष्ट केली. 

निवडणुकांसाठी राष्ट्रवादी युवकने आखली "सुपर सिक्स्टी"ची रणनीती

sakal_logo
By
डॉ. बाळ ज. बोठे पाटील

नगर : ""राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये येण्यासाठी अनेक नेते-कार्यकर्त्यांची चढाओढ लागली आहे. आगामी विधानसभा व लोकसभा निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस आतापासूनच कामाला लागली आहे. जिल्हाप्रमुख ते बूथप्रमुख, असे गावपातळीपासून नियोजन सुरू आहे. त्यासाठी "सुपर सिक्‍स्टी'ची रणनीती आखली आहे,'' अशी माहिती राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांनी दिली. 

शेख यांनी "कॉफी विथ सकाळ' या उपक्रमात शनिवारी (ता. 17) "सकाळ' कार्यालयास भेट देऊन संपादकीय "टीम'शी संवाद साधला. "सकाळ'चे कार्यकारी संपादक ऍड. डॉ. बाळ ज. बोठे पाटील यांनी सकाळ प्रकाशनाचे "राजकीय पत्रकारिता' हे पुस्तक भेट देऊन शेख यांचे स्वागत केले. शेख यांनी आपला राजकीय प्रवास उलगडतानाच पक्षाची ध्येयधोरणेही स्पष्ट केली. 

शेख म्हणाले, ""राष्ट्रवादी हा केवळ पक्ष नाही, तर विचार आहे. पक्षाचे संस्थापक व ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या विचारांनी प्रेरीत होऊन पक्षात मोठ्या प्रमाणात युवक येत आहेत. कोणत्याही पक्षाची ताकद युवक हीच असते. त्यांना विधायक दिशा देण्यासाठी, आम्ही कटिबद्ध आहोत. मी शिरूर कासार (जि. बीड) तालुक्‍यातील छोट्या गावातील सर्वसामान्य कुटुंबातील युवक. चुलते पोस्टमन होते, हीच आमच्यासाठी सर्वात मोठी "पोस्ट'. कोणतीही राजकीय पार्श्‍वभूमी नसताना, पक्षाने माझ्यावर एवढी मोठी जबाबदारी टाकली, हेच "राष्ट्रवादी'चे वैशिष्ट्य आहे.'' 

पक्षावर काही जण घराणेशाहीचा आरोप करतात, त्यांना माझी निवड हेच उत्तर असल्याचे सांगून शेख म्हणाले, ""माझ्याकडे "युवक'ची सूत्रे आली, तेव्हा पक्ष विरोधी बाकांवर होता. तत्कालीन फडणवीस सरकारच्या काळात महापोर्टलमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला होता. त्याविरोधात आवाज उठवला. "नरेंद्र, देवेंद्र हीच बेरोजगारीची केंद्र' अशा घोषण देत, ठिकठिकाणी आंदोलने केली. सरकारला "सळो की पळो' करून सोडले. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर "महापोर्टल' बंद केले.'' 
आम्ही सरकारकडेही रिक्त जागा भरण्यासाठी पाठपुरावा केला. विविध विभागांतील 1 लाख रिक्त पदे भरण्याची तयारी सुरू होती; परंतु कोरोनाचे संकट आल्याने, ते स्थगित करावे लागले. मात्र, आरोग्य आणि पोलिस विभागातील 29 हजार पदे भरली जाणार असल्याचे शेख यांनी स्पष्ट केले. 

हाताला काम देण्याचा प्रयत्न 
शेख म्हणाले, ""तरुण स्वत:च्या पायावर उभा राहावा, त्यांना रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी "राष्ट्रवादी युवक'ने "रोजगार-स्वयंरोजगार सेल'ची निर्मिती केली. त्याद्वारे युवकांना प्रशिक्षण देण्यात येते. सध्या कोरोनामुळे वेबिनार आयोजित केली जातात. व्यवसाय उभारणीसाठी मदत आणि मार्गदर्शन केले जाते. महिलांसाठी साबण, सॅनिटायझर, केक असे व्यावसायिक प्रशिक्षण दिले जात आहे. आतापर्यंत सहा हजार महिलांनी प्रशिक्षणासाठी नावनोंदणी केली आहे.'' 
असा आहे "सुपर सिक्‍स्टी'चा कार्यक्रम 
"राष्ट्रवादी'ने विधानसभेला 118 जागा लढवल्या. त्यातील चार जागा मित्र पक्षाला दिल्या. 54 जागांवर पक्षाने विजय मिळविला. आगामी निवडणुकांसाठी आतापासून "युवक'ने रणनीती आखली आहे. त्यानुसार, 60 मतदारसंघात "राष्ट्रवादी युवक'चा पूर्ण वेळ निरीक्षक देणार आहोत. गट, गण आणि बूथ अशी संरचना केली आहे. 358 तालुक्‍यांत मेळावे घेऊन संघटना बांधली जाणार आहे. निरीक्षक प्रत्येक ठिकाणचे गोपनीय अहवाल वरिष्ठांना पाठविल. तेथे पक्षाची ताकद किती आहे, काय कमतरता आहे, याचे विश्‍लेषण करून उणीव भरून काढली जाईल. या सर्व मतदारसंघातील 45 प्रश्‍नांवर चार वर्षे काम केले जाणार असून, मतदानाच्या वेळी प्रत्येक बूथवर "युवक'चे 10 कार्यकर्ते राहतील, अशी व्यवस्था करण्यात येणार आहे, असे शेख यांनी सांगितले. 

वैचारिक कार्यकर्ते निर्मितीसाठी "केडर कॅम्प' 
शेख म्हणाले, ""पक्षातील युवकांचे वैचारिक पोषण व्हावे, त्यांना योग्य दिशा मिळावी, यासाठी "केडर कॅम्प' आयोजित करण्यात येणार आहेत. माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्यापासून शरद पवार यांचे विचार, तसेच फुले-शाहू-आंबेडकर यांचा वैचारिक वारसा त्यातून सांगितला जाणार आहे. मंडल आयोगाची अंमलबजावणी, मराठवाडा नामांतर, महिला आरक्षण, असे क्रांतिकारी निर्णय पवारांनी घेतले. पुरोगामी विचार पेरण्याचे काम केले. हीच शिदोरी पुढच्या पिढीपर्यंत शिबिराद्वारे नेणार आहोत. त्यासाठी "टीमवर्क' हा महत्त्वाचा भाग ठरणार असून, "युवक'चा स्वतंत्र आयटी विभागही कार्यान्वित केला जाणार आहे.'' 

कोरोना संकटात मदतीसाठी धावलो 
शेख म्हणाले, ""कोरोना संकटात संपूर्ण महाराष्ट्रभर रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्याने, "राष्ट्रवादी युवक'ने "मी रक्तदान करणार, माझ्या भावाला जीवदान देणार' हे अभियान राबविले. त्यात राज्यात 394 रक्तदान शिबिरे घेऊन 15 हजार 700 रक्तपिशव्यांचे संकलन केले. लॉकडाउनमध्ये अनेकांच्या रोजीरोटीचा प्रश्‍न निर्माण झाला. युवक कॉंग्रेसने हेल्पलाइनच्या माध्यमातून सव्वा तीन लाख लोकांना धान्य व किराणा साहित्याचे घरपोच वाटप केले. राजस्थान व अन्य राज्यांत अडकलेल्या विद्यार्थ्यांना खासदार सुप्रिया सुळे यांच्या माध्यमातून महाराष्ट्रात आणले.'' 

संपादन - अशोक निंबाळकर