उपबाजार आवारामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना

आनंद गायकवाड
Sunday, 1 November 2020

कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे तालुक्‍यातील वडगाव पान येथील नवीन जागेत उपबाजार आवार सुरू करण्यात आले आहे.

संगमनेर (अहमदनगर) : कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे तालुक्‍यातील वडगाव पान येथील नवीन जागेत उपबाजार आवार सुरू करण्यात आले आहे. या ठिकाणी भरणाऱ्या जनावरांच्या बाजाराला मोठा प्रतिसाद मिळत असून, यामुळे तालुक्‍याच्या ग्रामीण भागातील शेतकरी व जनतेची मोठी सोय झाल्याची माहिती बाजार समितीचे सचिव सतीश गुंजाळ यांनी दिली.

शहरातील नाशिक- पुणे राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला कृषी उत्पन्न बाजार समिती आहे. या ठिकाणी कांदा- टोमॅटोसह डाळिंब आदी कृषी उत्पादने मोठ्या प्रमाणात विक्रीस येतात. या ठिकाणी पूर्वी जनावरांचा बाजारही सुरू होता. गर्दीचे विकेंद्रीकरण करताना, वाहतुकीवरील कोंडी, तसेच खरेदीदार व्यापारी व शेतकरी यांच्या सुविधेसाठी तालुक्‍यातील वडगाव पान येथे 16 एकर क्षेत्रावर उपबाजार आवार सुरू करण्यात आले आहे. या क्षेत्राचे सपाटीकरण करून, गोदाम व संरक्षक भिंत उभारण्यात आली आहे.

यापूर्वी 300 वृक्षांचे रोपण करण्यात आले असून, आणखी 200 झाडे लावण्यात येणार आहेत. माती असलेले मोकळे क्षेत्र उपलब्ध असल्याने, या ठिकाणी जनावरांचा बाजार कोरोना संकट थोडे कमी झाल्यानंतर सुरू करण्यात आला आहे. लवकरच या ठिकाणी शेळ्या- मेंढ्यांच्या विक्रीची व्यवस्था होणार आहे. येथे शेतकऱ्यांच्या सोयीसाठी बांधलेल्या गोदामात सहा टक्के व्याजदराने शेतमाल तारण ठेवून तत्काळ कर्ज देण्याची योजना राबविण्यात येत आहे. तसेच, कोल्हार-घोटी राज्यमार्गावर समनापूर हद्दीत भरणाऱ्या फ्लॉवर मार्केटला या ठिकाणी जागा उपलब्ध आहे. 

काकडी, मेथी, वांगी आदी पालेभाज्या- फळभाज्यांची घाऊक खरेदी व विक्री या ठिकाणी होणार आहे. तालुक्‍यातून प्रतिदिन 300 ते 400 वाहने भाजीपाला भरून पुणे, नाशिक, मुंबई शहरात जातात. या शेतमालाला स्थानिक पातळीवर बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचा विचार आहे.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Submarket premises boost rural economy