esakal | बारावीत असताना वडिलांचे निधन झाले; त्यानंतर जिद्दीने शिक्षण घेत ती झाली अधिकारी
sakal

बोलून बातमी शोधा

Success Story of Medical Officer at covid Center Anuja Navande

वडिलांचे हृदयविकाराच्या धक्क्याने अकस्मात निधन झाल्याने तीच्यासह पाच भावंडे, आई हतबल झाले होते.

बारावीत असताना वडिलांचे निधन झाले; त्यानंतर जिद्दीने शिक्षण घेत ती झाली अधिकारी

sakal_logo
By
आनंद गायकवाड

संगमनेर (अहमदनगर) : वडिलांचे हृदयविकाराच्या धक्क्याने अकस्मात निधन झाल्याने तीच्यासह पाच भावंडे, आई हतबल झाले होते. शिक्षण हीच पुढील भविष्यातील एकमेव शिदोरी असल्याची जाणीव झाल्याने, तिने जिद्दीने शिक्षण घेण्याचे ठरवले. 

संगमनेरच्या सिध्दकला आयुर्वेद महाविद्यालयातून नुकतीच बीएएमएस पदवी घेवून बाहेर पडलेल्या डॉ. अनुजा नावंदे हिची कंधार, जि. नांदेड येथील कोवीड केअर सेंटरमध्ये वैद्यकिय अधिकारी म्हणून नेमणूक झाली आहे.

संगमनेरच्या घासबाजारात खासगी खोलीत राहणाऱ्या अनुजाची ओळख समवयीन मैत्रिणीबरोबर झाली. तिळगुळासाठी तिच्या घरी गेल्यानंतर आधार फाऊंडेशनचे समन्वयक रामदास बालोडे यांना तिची शैक्षणिक पार्श्वभुमी समजली. ती बारावीला असताना तिच्या वडीलांचे 2014 मध्ये हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले.

घरातला कर्ता पुरुष अकस्मात गेल्याने कुटूंब हादरुन गेले. या दरम्यान अनुजा हिला शासकिय कोट्य़ातून संगमनेरच्या सिध्दकला महाविद्यालयात प्रवेश मिळाला. शिक्षणासाठी येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी आधार फाऊंडेशनने तिला दत्तक घेत मदतीचा हात पुढे केला. तीची पदवी पूर्ण होईपर्यंत तिला लागणाऱ्या वह्या पुस्तकांपासून शैक्षणिक बाबतीत येणाऱ्या आर्थिक अडचणी आधारच्या मदतीने दूर झाल्या. 

नुकतीच बीएएमएसची पदवी हातात पडल्याबरोबर तिला नांदेड जिल्ह्यातील कंधार येथील कोविड केअर सेंटरमध्ये वैद्यकिय अधिकारीपदी रुजू होण्याची संधी मिळाली. तिचा एक भाऊ पुण्यात अभियांत्रिकीच्या तिसऱ्या वर्षात शिकतो आहे. त्याला आधारचे सदस्य गुप्तचर विभागातील अधिकारी मृणाल पवार यांनी शिक्षणासाठी दत्तक घेतले आहे.

दुसऱी बहिण फार्मसी करते आहे, तिसरी वैद्यकिय प्रवेश परीक्षेची तयारी करते आहे, तर सर्वात लहान भाऊ सातवीत शिकतो आहे. बालोडे परिवाराने तिला संगमनेरात दिलेले मुलीसारखे प्रेम, लावलेला लळा ती विसरु शकत नाही. आधारचे आभार व्यक्त करतानाच थोडे आर्थिकदृष्ट्या स्थिरावल्यानंतर आधारचा वसा पुढे चालवण्याचा निर्धार अनुजाने केला आहे.

संपादन : अशोक मुरुमकर

loading image
go to top