मुळा कारखान्याला साखर आयुक्तांची भेट, आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारण्याचे आवाहन

विनायक दरंदले
Thursday, 24 December 2020

परिस्थिती नसताना केवळ स्पर्धेपोटी काही कारखाने ऊसाचे दर वाढवतात. पण शेतकऱ्यांना ऊसाचे पेमेंट वेळेवर केले जात नाही. साखर कारखानदारीमुळे जी समृद्धी आली आहे.

सोनई : "राज्यातील सहकारी साखर कारखान्यांचा पाया मजबूत आहे. मात्र, स्पर्धेत टिकण्यासाठी व नवे आव्हान लक्षात घेऊन आधुनिक तंत्रज्ञानाला स्विकारत नवनवीन बदल स्विकारावेच लागतील, असे प्रतिपादन राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी केले. 

सोनई येथील मुळा सहकारी साखर कारखान्याला दिलेल्या भेटीनंतर ते बोलत होते. या वेळी साखर संचालक ज्ञानदेव मुकणे, नगरचे विभागीय उपसंचालक राजेंद्रकुमार जोशी व विशेष लेखापरीक्षक विलास सोनटक्के उपस्थित होते.

'मुळा' चे अध्यक्ष नानासाहेब तुवर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. उपाध्यक्ष भाऊसाहेब मोटे, संचालक बबन दरंदले, एकनाथ जगताप, नारायण लोखंडे यांनी मान्यवरांचा सत्कार केला. साखर आयुक्त गायकवाड यांच्या हस्ते या हंगामात तयार झालेल्या तीन लाख अकरा हजार साखर पोत्यांचे पूजन झाले. 

परिस्थिती नसताना केवळ स्पर्धेपोटी काही कारखाने ऊसाचे दर वाढवतात. पण शेतकऱ्यांना ऊसाचे पेमेंट वेळेवर केले जात नाही. साखर कारखानदारीमुळे जी समृद्धी आली आहे. ती टिकवायची असेल तर पुढच्या वीस वर्षाचा अंदाज घेतला पाहिजे, असे गायकवाड यांनी सांगितले.

'मुळा'च्या विक्रमी गळीता बद्दल कार्यकारी संचालक शरद बेल्हेकर यांचा सत्कार झाला. गायकवाड यांनी सर्व प्रकल्पास भेट देवून पाहणी केली. गडाख वस्तीवर जाऊन त्यांनी ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांची भेट घेवून चर्चा केली. अहमदनगर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sugar Commissioner's visit to Mula Factory