नव्या तंत्रज्ञानाने असा आणला ऊस, पहाण्यासाठी लागल्या लोकांच्या रांगा

चंद्रकांत दरंदले
Saturday, 5 December 2020

निकम यांची जमीन मध्यम काळी आहे. त्यांनी उसाच्या लागवडीसाठी चार फुटांची सरी, दोन डोळ्यांची टिपरी बेणेप्रक्रिया करतांना जैविक खतांचा वापर केला.

नेवासे फाटा : सलाबतपूर (ता.नेवासे) येथील देविदास रावसाहेब निकम यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उसाचे भरघोस पीक आणले आहे. त्यांचा भरगच्च असा ऊसाचा प्लॉट सलाबतपूर परिसरात शेतकऱ्यांचे आकर्षण ठरत आहे.

निकम यांची जमीन मध्यम काळी आहे. त्यांनी उसाच्या लागवडीसाठी चार फुटांची सरी, दोन डोळ्यांची टिपरी बेणेप्रक्रिया करतांना जैविक खतांचा वापर केला. जमिनीचा निचरा उत्तम असल्यामुळे उसाची जोमदार वाढ सुरुवातीपासूनच झाली. लागवडीचा बेसल डोस देताना शेणखत, निंबोळी पेंड, ह्युमस, विशेषतः रासायनिक सरळ खते, युरिया सुपरफॉस्फेट, पोटॅश यांचा माती परीक्षणानुसार वापर केला. परिपूर्ण व समतोल आहार देण्यासाठी सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर करून झिंक सल्फेट, आयर्न सल्फेट, मॅंगेनीज सल्फेट दिले. 

या उस शेताला कृषी शास्त्रज्ञ डॉ.अशोक ढगे यांनी भेट देऊन देविदास निकम यांचे कौतुक केले. डॉक्टर ढगे म्हणाले, एका एकरामध्ये चाळीस हजार ऊस असतील व सरासरी एका उसाचे वजन अडीच किलो असेल तर सहज एकरी शंभर टनाचे उद्दिष्ट गाठता येते. शेतीच्या कामात त्यांना पत्नी कविता आणि मुले सौरभ व गौरव हे मदत करतात. 

या एकराच्या उसाच्या प्लॉटमध्ये किमान १०० टन उत्पादन निघेल, त्यासाठी ४७ हजार रूपये खर्च आला आहे. 

 

आपल्या शेतात तन मन धनाने व निष्ठेने काम केल्यास हवे तसे उत्पन्न घेता येते. ऊसासाठी आधुनिक पद्धतीने व शास्त्रीय ज्ञानावर आधारित खताचे व पाण्याचे व्यवस्थापन केल्यास पीक हमखास चांगले येते. 

- देविदास निकम, शेतकरी, सलाबतपूर.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sugarcane plot brought by new technology