श्रीगोंद्यात 20  वर्षाच्या तरुणीची आत्महत्या; जिल्हा बँकेतील कर्मचाऱ्यासह तिघांविरुध्द गुन्हा

संजय काटे
Saturday, 25 July 2020

श्रीगोंदे येथील अधिपारिचारीका असणाऱ्या नातेवाईकांकडे सुट्टीसाठी आलेल्या २० वर्षाच्या मुलीने शुक्रवारी (ता. २४) गळफास घेवून आत्महत्येचा प्रयत्न केला. 

श्रीगोंदे (अहमदनगर) : श्रीगोंदे येथील अधिपारिचारीका असणाऱ्या नातेवाईकांकडे सुट्टीसाठी आलेल्या २० वर्षाच्या मुलीने शुक्रवारी (ता. २४) गळफास घेवून आत्महत्येचा प्रयत्न केला. दरम्यान तिचा पहाटे २ वाजता मृत्यू झाला. तिच्या मृत्यूचे कारण समोर आले आणि गोंधळ उडाला. 

मृत्यू झालेली तरुणी मुळची माळीनगर (अकलुज) येथील असून करमाळा येथे शिक्षण घेते. तेथेच त्या दोघांचे प्रेमाचे सुत जुळले. दोघांचे नातेवाईक श्रीगोंद्यात शिवाय खोलीही समोरासमोर त्यामुळे सुट्टीत ते दोघांची येथेच गाठभेट सुरु झाली. मात्र तो विवाहित असल्याचे तिला समजले आणि पायाखालची जमिनच सरकली. त्यातच त्याने तीचा मानसिक शारिरीक छळ सुरु केला आणि त्याच नैराश्यतून त्या तरुणीने आत्महत्या केली.

याप्रकरणी श्रीगोंदे पोलिसांनी धनंजय विष्णुपंत कांबळे (रा. जेवळी, ता. लोहार, जि. उस्मानाबाद) त्याचा भाऊ विजय विष्षुपंत कांबळे व त्याची पत्नी यांच्याविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. मुख्य संशयित आरोपी धनजंय हा (रा. जवळा, ता. जामखेड) येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत कामाला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. मयत पिडीत ही श्रीगोंदे येथील पोलिस ठाण्याच्या पाठीमागील सरकारी क्वार्टरला तीच्या

नातेवाईकांकडे राहत होती. मुख्य धनंजय हा समोरच्याच खोलीत असणाऱ्या त्याच्या भावाकडे सुट्टीच्या दिवशी येवून राहायचा. या दोघांची अगोदरच मैत्री व प्रेम होते. काही दिवसांपुर्वी धनंजय हा विवाहित असल्याचे तिला समजले. त्याला जाब विचारला असता, संशयित आरोपी कांबळे याने उलट त्या मुलीला व तिच्या घरच्यांना शिवीगाळ, दमदाटी करीत काय करायचे ते करा, असे धमकावले. त्यानंतरही संशयित आरोपीने त्या पिडीत मुलीवर बळजबरीने अनेकवेळा अत्याचार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

धनंजय कांबळे याने फसविल्याने नैराश्येत गेलेल्या त्या पिडीत मुलीने शेवटी घरातील पंख्याला गळफास घेतला. तिला उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल केले. मात्र ती रात्री दोनच्या सुमारास मृत्यूमुखी पडली. काबंळे कुटुंबातील तिघांविरुध्द मृत्यूस कारणीभुत ठरल्याप्रकरणी व मुख्य संशयित आरोपी धनंजय काबंळे याच्यावर बलात्काराचाही गुन्हा दाखल केला आहे.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Suicide of a 20 year old girl in Shrigonda